श्रीगोंदे : मोटार अपघात दाव्यामध्ये मयत व्यक्तीच्या ७७ वर्षीय वडिलांसह इतर वारसांना सव्वा वर्षामध्ये इन्शुरन्स कंपनीच्यावतीने १४ लाख ७५ हजारांचा विमा मंजूर करत श्रीगोंदा येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाची सुरुवात करण्यात आली. शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदामतीमध्ये मोटार अपघात, भू संपादन, कौटुंबिक वाद, दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे, तसेच ग्रामपंचायत, नगरपालिका, बँक, महावितरणची ११ हजार ९९४ पैकी ५ हजार ६७६ प्रकरणे निकाली काढण्यात येऊन ५ कोटी १४ लाख २२ हजार ९३० रुपयांची वसुली करण्यात आली.
लोकअदालतमध्ये सामंजस्याने प्रकरणे मिटविल्याने दोन्ही पक्षकारांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होतात तसेच लोकअदालतमध्ये प्रकरण मिटवून घेतल्याने वेळ व पैसा वाचतो. त्यामुळे लोकअदालतमध्ये जास्तीत -जास्त प्रकरणे निकाली काढून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांनी केले. मोटार अपघात दाव्यामध्ये अर्जदारातर्फे अॅड. बी. ए. नागवडे तसेच सामनेवाले इन्शुरन्स कंपनीतर्फे अॅड. मेहेर यांनी कामकाज पाहिले. ज्येष्ठ नागरिक असलेल्या ८८ वर्षाच्या महिला प्रतिवादी कांताबाई गोरख गाडेकर आणि प्रतिवादी यांनी आपआपसात तडजोड करून दावा निकाली काढण्यात आला.
कोर्टामध्ये वारंवार चकरा मारणे बंद झाल्याने व आपआपसात तडजोड झाल्याने ज्येष्ठ नागरिक महिला प्रतिवादी हे आनंदी होऊन न्यायालयाचे आभार मानले. सदर प्रकरणामध्ये वादीतर्फे ॲड. एस. पी. राऊत, प्रतिवादीतर्फे ॲड. एस. एस. पवार यांनी तडजोड करणेकामी मदत केली. तसेच महिलांचा कौटुंबिक हिंसाचार कायदा अन्वये चाल असणाऱ्या प्रकरणामध्ये पत्नी कृष्णाई उर्फ करिष्मा राजेश साळुंके व पती राजेश हरिभाऊ साळुंके (रा. ढोकराई फाटा, गोंडे वस्ती, श्रीगोंदा) यांनी आपआपसात तडजोड झाल्याने त्यांना न्यायालयामार्फत साडी चोळी देऊन नांदावयास पाठविण्यात आले. यापुढे कोणतेही भांडण न करता गुण्यागोविंदाने संसार करण्याचा सल्ला जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांनी दिला. या प्रकरणामध्ये अर्जदारातर्फे ॲड. ए.एम. फडणीस तसेच सामनेवाले तर्फे ॲड. टी. आर. हजारे यांनी तडजोड करणेकामी मदत केली.
कार्यक्रमासाठी जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश मुजीब शेख, जिल्हा न्यायाधीश डी. पी. शिंगाडे, दिवाणी न्यायाधीश एच. जे. पठाण, सी. व्ही. शिरसाठ, सहदिवाणी न्यायाधीश के. ए. काटकर, एन. पी. बाजी, श्रीगोंदा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रसाद इंगळे, उपाध्यक्ष ॲड. नरेंद्र भोस, सचिव ॲड. प्रताप तिखोले, खजिनदार ॲड. प्रकाश गारुडकर, ॲड. रंगनाथ बिबे, ॲड. बी.एन. काकडे, सर्व बँकाचे प्रतिनिधी, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी, महावितरण अधिकारी व कर्मचारी तसेच इतर शासकीय अधिकारी व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. बी. एन. काकडे यांनी केले.