Nagar : आकाशवाणी केंद्राचा 34 वा वर्धापन दिन साजरा

अहिल्यानगर : राज्यातील लाखो श्रोत्यांचे ज्ञान, माहिती आणि मनोरंजन करणाऱ्या आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा ३४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
बहुजन हिताय बहुजन सुखात हे ब्रीद घेऊन गेली ३४ वर्ष अहिल्यानगर आकाशवाणी केंद्र श्रोत्यांची अविरत सेवा करत आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आणि नटराज पूजनाने वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची सुरवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसारण अधिकारी सुदाम बटुळे यांनी केले. यावेळी त्यांनी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या वाटचालीचा आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रम निर्मितीचा आलेख मांडला. केंद्राचे सहायक अभियंता मोईन शेख यांनी उपस्थितांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात संगीत अलंकार गायिका संपदा चौधरी, वैष्णवी मोरे, प्रमिला वाघ, संगीता पवार आदींनी शास्त्रीय संगीतातील विविध राग सादर केले. भरतनाट्यम विशारद करिश्मा कोठारी यांनी गणेश वंदना प्रस्तुत केली. चेतन औटे, संजय वैरागर, आदिनाथ अन्नदाते आदींनी हास्य कला, विद्या जोशी यांनी एकपात्री अभिनय तर दिप्ती शुक्रे, विकास कावरे,अक्षता अन्नदाते, शालिनी वाघ, निकिता रसाळ, श्रेयस लहामगे, अतुल सातपुते आदींनी विविध गुणदर्शन सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
यावेळी आकाशवाणीचे अभियांत्रिकी सहायक गजेंद्र पवार, महेंद्र रोहोकले, देविदास अवलेलु, संतोष साबळे, रावसाहेब देशमाने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा शेटे यांनी तर जयंत लाटे यांनी आभार मानले.





