अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या जन्म व मृत्यू प्रमाणपत्र कार्यालयातील नागरिकांना होणारा प्रचंड त्रास हा अत्यंत गंभीर आणि असहाय्य झाला असून, या कार्यालयातील दिरंगाई, बेफिकीरपणा आणि कर्मचाऱ्यांच्या उध्दट वर्तनात त्वरीत सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात यावेत. अशा मागणीचे पत्र खा. नीलेश लंके यांनी महापालिकेच्या आयुक्तांना दिले आहे.
या पत्रामध्ये खा. लंके यांनी नमूद केले आहे की, नगर शहरात मोठया प्रमाणावर जन्म, मृत्यूची नोंद होत असल्याने शहरासोबतच ग्रामीण भाग आणि इतर तालुक्यांतूनही हजारो नागरिक प्रमाणपत्रासाठी या कार्यालयात येत असतात. मात्र, त्यांना वेळेवर सेवा मिळत नाही. कर्मचाऱ्यांकडून उध्दट वर्तन केले जाते. नागरिकांना अनेकदा फेऱ्या माराव्या लागतात. या कार्यालयातील ही परिस्थिती अतिशय गंभीर असून, प्रशासनाने तातडीने सुधारणा करणे आवश्यक असल्याचे खा. लंके यांनी या पत्रात नमूद केले आहे.
प्रमाणपत्र तातडीने द्यावे
जन्म व मृत्यू प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे. अर्जदारांना ठराविक कालमर्यादेत प्रमाणपत्र मिळेल याची हमी घेण्यात यावी. अनावश्यक दिरंगाई केल्यास सबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. कर्मचाऱ्यांचे वर्तन सुधारावे. कर्मचारी जनतेशी नम्रपणे आणि सहानुभूतीने वागतील, याची जबाबदारी आयुक्तांची आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याने उध्दट वर्तन केल्यास त्याच्यावर निलंबनासह कठोर कारवाई करण्यात यावी, असे खा. लंके यांनी या पत्रात म्हटले आहे.
आरोग्य अधिकारी जबाबदारी टाळतात
आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला असता ते जबाबदारी घेण्याऐवजी टाळताना दिसून येतात. माहिती सुविधा केंद्र दुपारी चार वाजता बंद करतात. त्याची वेळ चारऐवजी सायंकाळी पाच अशी करण्यात यावी. जेणेकरून नागरिकांना मागे जावे लागणार नाही, अशी सूचनाही खा. लंके यांनी केली आहे.