‘नाफेड’कडून राज्यात कांदा खरेदीला सुरुवात

पुण्यासह पाच जिल्ह्यांत खरेदी केंद्र : शेतकऱ्यांकडून 50 हजार टन कांदा घेणार

पुणे – “नाफेड’च्या वतीने कांदा खरेदी करण्यास सुरुवात करण्यात आली असून, राज्यात 50 हजार टन कांदा खरेदी होणार आहे. त्या अनुषंगाने बाजार समित्यांमधून खुल्या लिलाव पद्धतीने, तर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शिवार खरेदी पद्धतीने कांदा खरेदी होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी बाजार समितीमधून कांद्याची खरेदी सुरू झाली आहे. त्यानुसार या कंपन्या नाशिक, नगर, पुणे, औरंगाबाद, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये खरेदी करणार आहेत.

नाफेडच्या संचालक मंडळाच्या 29 एप्रिलला झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मंजूर निविदा व कर्मचाऱ्यांची उपलब्धता या कारणांमुळे खरेदीचा निर्णय लांबला होता. मात्र, यावर आता निर्णय झाल्याने कांदा खरेदी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने लासलगाव येथे कांदा खुल्या पद्धतीने लिलावासाठी नाफेड उतरणार आहे. तसेच पिंपळगाव बसवंत येथेही खरेदीची तयारी सुरू आहे. चांगली टिकवण क्षमता असलेला, उच्च गुणवत्तेच्या कांद्याच्या खरेदीला प्राधान्य दिले जाणार आहे.

सध्या, नाफेडकडे स्वमालकीचे, तसेच एनएचआरडीएफ व व्यापाऱ्यांच्या भाडेतत्त्वावर घेतलेल्या कांदाचाळींची साठवणूक क्षमता 14 हजार टनांपर्यंत आहे. त्या तुलनेत मागील वर्षी शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे अधिक साठवणूक क्षमता असल्याने त्यांच्याकडे कांदा साठवला होता. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांना अधिक खरेदीसाठी प्राधान्य दिले जात आहे. मागील वर्षी 45 हजार टनाचे राज्यात उद्दिष्ट होते. मात्र, 47 हजार टन खरेदी झाली होती. याही वर्षी पाच हजार टनांनी उद्दिष्ट वाढले आहे.

यात अजून वाढ व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. नाफेड या वर्षी 70 हजार टनापर्यंत कांदा खरेदी करेल, अशी शक्‍यता होती. मात्र, 50 हजार टनाचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. ही खरेदी ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येत असल्याने उद्दिष्ट वाढविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना आग्रह धरल्यास खरेदीचे उद्दिष्ट वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे केंद्राकडे रेटा लावून धरावा लागणार आहे.

भाव स्थिर राहणार…
शिवार खरेदी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात नारायणगाव (ता. जुन्नर), नाशिक जिल्ह्यातील नायगाव (ता. सिन्नर), ताहाराबाद (ता. सटाणा) येथे शिवार खरेदी पद्धतीने कामकाज सुरू झाले आहे. त्यानुसार या कंपन्या नाशिक, नगर, पुणे, औरंगाबाद, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये खरेदी करणार आहेत. उन्हाळी कांदा लागवडीचे क्षेत्र चालू वर्षी कमालीचे वाढले आहे. सध्या कांदा काढणी होऊन बाजारात येणाऱ्या कांद्याला अपेक्षित दर नाही. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, भाव स्थिर राहण्याची चिन्हे आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.