नवी दिल्ली – कांद्याचा बफर स्टॉक तयार करण्यासाठी नाफेड संस्थेने आत्तापर्यंत 95 हजार टन कांदा खरेदी केली आहे अशी माहिती त्यांच्या सूत्रांकडून देण्यात आली. गेल्या वर्षी नाफेडने 57 हजार टन कांदा खरेदी केली होती.
यंदा एकूण 1 लाख टन कांदा खरेदीचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले होते. पुढील दोन ते तीन दिवसांत आम्ही हे उद्दीष्ट पुर्ण करू अशी माहिती नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक एस. के. सिंह यांनी दिली.
खरीप हंगामात खरेदी केलेल्या कांद्यापेक्षा रबी हंगामात खरेदी केलेला कांदा बराच काळ साठवून ठेवता येऊ शकतो असेही त्यांनी सांगितले. रबी हंगामात महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात मधील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतात. नाफेडने सरासरी 10 ते 11 रूपये या दराने हा कांदा खरेदी केला आहे असे ते म्हणाले.