माद्रिद – स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल याने आगामी विम्बल्डन टेनिस स्पर्धा, तसेच टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. तंदुरुस्त नसल्याने आपण हा निर्णय घेत असल्याचेही त्याने सांगितले आहे.
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या नोवाक जोकोविचकडून उपांत्य फेरीत पराभूत झाल्यावर त्याला विम्बल्डन, तसेच ऑलिम्पिक स्पर्धेतील यश खुणावत होते. मात्र, जोकोविचविरुद्धच्या लढतीत त्याला शारीरिक थकवा जाणवत होता. त्यानंतर पूर्ण आराम मिळावा व नव्या मोसमात नव्या उत्साहाने विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे त्याने ठरवल्याचेही सांगितले.
विम्बल्डन स्पर्धेला पुढील आठवड्यात प्रारंभ होत असून, त्यापूर्वीच त्याने आपल्या माघारीचा निर्णय जाहीर केल्यामुळे जागतिक टेनिसशौकिनांची चांगलीच निराशा झाली आहे.
टोकियो ऑलिम्पिक 23 जुलैपासून सुरू होणार आहे. मात्र, इतक्या कमी वेळात आपण पूर्ण तंदुरुस्त होणार नाही, असेही मत त्याने व्यक्त केले.