मॉंट्रियल – अग्रमानांकित व माजी विजेत्या राफेल नदालने मॉंट्रियल टेनिस स्पर्धेतील तिसऱ्या फेरीकडे वाटचाल केली. त्याच्याबरोबरच डॉमिनिक थिएमनेही अपराजित्त्व राखले. नदालने चुरशीच्या लढतीत इंग्लंडच्या डॅनिअल इव्हान्सचा 7-6 (8-6), 6-4 असा पराभव केला. या सामन्यात पावसामुळे दोन तास व्यत्यय निर्माण झाला होता.
नदालची पुढच्या फेरीत अर्जेन्टिनाच्या गुईदो पेलाबरोबर सामना होणार आहे. गुईदोने राडू अल्बोटचे आव्हान 6-3, 2-6, 7-6 (7-2) असे संपुष्टात आणले. द्वितीय मानांकित थिएमने स्थानिक खेळाडू डेनिस शापोव्हालोव्हचा 6-3-6, 6-3 असा पराभव केला. त्याला आता 2004 चा अमेरिकन विजेता खेळाडू मरिन चिलीच याचे आव्हान आहे. चिलीचने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनवर 6-3, 6-4 असा विजय मिळविला. मिलोस राओनिकने कॅनडाच्या फेलिक्स ऍग्युर अलिआसिमीविरूद्धच्या लढतीत दुखापतीमुळे माघार घेतली.
नदालने सांगितले की, पावसामुळे माझी लय बिघडली. अन्यथा मी हा सामना सरळ दोन सेट्समध्ये घेतला असता. आतापर्यंत माझ्या कामगिरीबाबत मी समाधानी आहे. गुईदो हा नैपुण्यवान खेळाडू आहे. त्याच्याकडे अनपेक्षित कामगिरी करण्याची क्षमता आहे. तो बेसलाईनवरून फटके मारण्याबाबत ख्यातनाम आहे. त्यामुळेच त्याच्याविरूद्ध मला गांभीर्याने खेळावे लागणार आहे. विम्बल्डन स्पर्धेतील उपांत्य फेरीत नदालला रॉजर फेडररकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर त्याची ही पहिलीच स्पर्धा आहे.
तो म्हणाला, विम्बल्डन स्पर्धेनंतर थोडे दिवस विश्रांती घेणे आवश्यक होते. फ्रेंच स्पर्धेत क्ले कोर्ट व विम्बल्डनमध्ये ग्रास कोर्टवर खेळावे लागते. दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या तंत्राचा उपयोग करावा लागतो. थिएमने सांगितले की, चिलीचविरूद्ध माझी कसोटीच ठरणार आहे. तो अतिशय महान खेळाडू आहे. त्याने ग्रॅंड स्लॅमचे विजेतेपद मिळविले आहे. उंचीचा फायदा घेत खोलवर परतीचे फटके मारण्याबाबत त्याची हुकमत आहे. अर्थात त्याला मी आत्मविश्वासाने सामोरे जाणार आहे.