“एनए’ फायली गायब प्रकरणाची होणार तपासणी

हवेली कार्यालयातील प्रकरण : तक्रारींची विभागीय आयुक्‍तांकडून दखल

पुणे – हवेली तहसीलदार कार्यालयातून “एनए’च्या फायली गायब होणे, तलाठ्यांकडून सातबारा उताऱ्यावर वेळेत नोंदी न घेणे आदी तक्रारींची दखल आता खुद्द विभागीय आयुक्‍त यांनी घेतली आहे. हवेली तहसीलदार कार्यालय आणि तलाठी कार्यालय यांची चौकशी करून त्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा, असे आदेश विभागीय आयुक्‍त यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. विभागीय आयुक्‍तांच्या या आदेशामुळे हवेलीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

हवेली तहसील कार्यालयात वेळेवर कामे होत नसल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या. तसेच कामे करण्यासाठी वरिष्ठांना भेटा असे सल्ले देण्यात येतात. हेलपाटे मारूनही कामे नसल्याने या कार्यालयाविषयीच्या तक्रारी वाढल्या होत्या. याविषयी काही नागरिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपले ग्राऱ्हाने मांडले होते. बुधवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी तलाठ्यांचे दफ्तर तपासणी करण्याचे आदेश दिले होते.

त्याचबरोबर विभागीय आयुक्‍त कार्यालयातदेखील हवेली तहसील आणि तलाठी कार्यालयातील कारभाराबाबत अनेक तक्रार प्राप्त झाल्या आहेत. यासर्वची दखल घेऊन विभागीय आयुक्‍त दीपक म्हैसकर यांना पत्र देऊन नाराजी व्यक्‍त केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशी पथके नेमावीत. चौकशी करून त्वरित अहवाल सादर करावा. जे दोषी असतील, तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. केलेल्या कारवाईची माहितीदेखील कळावी, असे या पत्रात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.