म्हैसुरू – देशभर खळबळ माजवणाऱ्या म्हैसुरू येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. सहावा आरोपी अद्याप फरार आहे. मात्र, पोलीस त्याच्या मागावर असल्याची माहिती कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी दिली.
आरोपींकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत एक जण अल्पवयीन असल्याचे समजते. त्याची चौकशी सुरू आहे. चार आरोपींना तमिळनाडूतील सत्यमंगल येथे बेड्या ठोकण्यात आल्या. तर एकाला कर्नाटकातील कामराजनगर येथून ताब्यात घेण्यात आले. तमिळनाडूतून अटक केलेल्यांपैकी तिघांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे.
दरम्यान, कर्नाटकचे गृहमंत्री अर्ग जननेंद्र यांनी हे प्रकरण उघड करण्यात पोलिसांना यश आल्याचे सांगितले. मात्र, त्याबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री बसवराज बोमणी यांनी सांगितले होते की, पोलीस या प्रकरणाचा शक्य तेवढ्या लवकर छडा लावतील आणि गुन्हेगारांना अटक करतील. या प्रकरणाचा तपास पाच पोलीस पथके करत आहेत. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून त्याच ते छडा लावतील अशी मला खात्री आहे.
म्हैसुरूच्या बाहेर चामुंडी टेकड्यांच्या पायथ्याला 24 ऑगस्टला एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता. तिच्यासोबत असणाऱ्या मित्राला बेदम मारहाण करण्यात आली होती. कर्नाटकचे पोलीस महानिरीक्षक प्रवीण सूद यांनी या प्रकरणाच्या तपासावर लक्ष दिले होते. या घटनेनंतर जनतेतून निषेधाचे तीव्र स्वर उमटले होते.