वॉशिंग्टन : अमेरिकेची संरक्षण संस्था पेंटॅगॉनने 3 व्हिडिओ प्रसिद्ध केले. या व्हिडिओमध्ये अवकाशातून उडत जाणारी काही अज्ञात वस्तू दिसत आहे. या अज्ञात वस्तूबाबतचे व्हिडिओ पूर्वी एका खासगी कंपनीने प्रसिद्ध केले होते. मात्र आता अमेरिकेची संरक्षण संस्था पेंटॅगॉननेच त्याबाबतचा व्हिडिओ प्रसिद्ध केला असल्यामुळे ही वस्तू नक्की काय होती, याबत गूढ व्यक्त होत आहे.
या व्हिडिओमध्ये अवकाशातून काही वस्तू वेगाने उडत जाताना दिसते आहे. इन्फ्रारेड कॅमेऱ्याद्वारे या अज्ञात वस्तूला टिपले गेले आहे. अमेरिकेच्या नौदलातील कर्मचाऱ्यांनीही ही अज्ञात वस्तू बघितली आणि त्यांच्या चेहऱ्यावरही या अज्ञात वस्तूबाबतचे कुतूहल आणि भीतीच्या प्रतिक्रियाही या 3 पैकी 2 व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहेत. हे व्हिडिओ खरे आहेत की खोटे आहेत, याबाबत नागरिकांच्या मनामध्ये संदेह राहू नये, यासाठी अमेरिकेच्या नौदलानेच हे व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत, असे पेंटॅगॉनचे प्रवक्ते स्यू गॉफ यांनी म्हटले आहे.
या अज्ञात वस्तूबाबत सविस्तर तपासणी केली असता या वस्तूमध्ये काहीही संवेदनशील नव्हते, तसेच अवकाशातून कोणतीही वस्तू पडली नसल्याचे लष्कराकडूनही तपासणीनंतर सांगण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. नौदलाचा व्हिडिओ सर्वप्रथम डिसेंबर 2017 आणि मार्च 2018 मध्ये स्टार्स ऍकॅडमी ऑफ आर्टस ऍन्ड सायन्सकडून प्रसिद्ध करण्यात आला होता. या अज्ञात वस्तू म्हणजे अंतराळातील परग्रहवासी असल्याचा दावा या संस्थेचे प्रमुख ल्युईस एलिझोंद यांनी 2017 मध्ये केला होता.