सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत आठ मतदारसंघांमध्ये पंधरा लाखांहून अधिक मतदार मतदान करणार आहेत. त्यांच्या डाव्या हातांच्या तर्जन्यांवर शाई लावण्यासाठी 9 हजार 231 बाटल्यांचे वाटप करण्यात आले आहे. ही शाई बोटावर लावताच वीस सेकंदांमध्ये ती वाळते.
ही शाई कितीही पुसण्याचा प्रयत्न केला तरी पुसली जात नाही. ही शाई म्हैसूर पेंटस् अँड वॉर्निश लिमिटेड कंपनीत तयार केली जाते. ही कंपनी कर्नाटक सरकारच्या अंर्तगत काम करत असून केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी शाईचा पुरवठा करण्याचे कंत्राट या एकमेव कंपनीला दिले आहे.
जिल्ह्यातील 15 लाखांहून अधिक मतदारांच्या डाव्या हातांच्या तर्जन्यांवर पुन्हा ही शाई लागणार आहे. या निवडणुकीत 21 ऑक्टोबरला मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेसाठी शाईच्या 9,231 बाटल्यांचे वितरण करण्यात आले आहे. एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर त्याच्या डाव्या हाताच्या कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.