पंजाब कॉंग्रेसमधील धुसफूस थांबेना
चंडीगढ: माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी त्यांच्या पत्नीने त्या राज्याचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावर केलेल्या आरोपाचे समर्थन केले आहे. माझी पत्नी कधीच खोटे बोलणार नाही, असे सिद्धू यांनी म्हटले आहे. त्यामुळे ऐन निवडणूक काळात चव्हाट्यावरील आलेली पंजाब कॉंग्रेसमधील धुसफूस थांबण्याची चिन्हे नसल्याचेच स्पष्ट होत आहे.
सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर याही राजकारणात सक्रिय आहेत. माजी आमदार असणाऱ्या कौर या अमृतसरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होत्या. मात्र, कॉंग्रेसने त्यांना डावलले. त्यापार्श्वभूमीवर, मला उमेदवारी नाकारण्यामागे अमरिंदर आणि कॉंग्रेस प्रभारी आशा कुमारी असल्याचा आरोप कौर यांनी काही दिवसांपूर्वी केला. त्यामुळे कॉंग्रेसच्या गोटात खळबळ उडाली. पत्नीने केलेल्या आरोपाबाबत पत्रकारांनी गुरूवारी सिद्धू यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावर सिद्धू पत्नीच्या पाठिशी उभे राहिले. याआधीही सिद्धू दाम्पत्य आणि अमरिंदर यांच्यातील मतभेद समोर आले होते. ते कायम असल्याचेच स्पष्ट होत आहे.