माझा विजय म्हणजेच जनतेचा विजय

शिवेंद्रराजे; विरोधकांच्या भूलथापांना जनता भीक घालणार नाही
सातारा –
गेल्या 10-15 वर्षात सातारा-जावळी मतदारसंघात अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. विरोधात राहून मतदारसंघाच्या गरजेची मोठी विकासकामे मार्गी लागणार नव्हती. ती कामे मार्गी लागावीत आणि संपूर्ण मतदारसंघाचा गतीने विकास व्हावा यासाठी मी भाजपमध्ये गेलो आहे. विरोधकांनी आजवर काडीचेही काम केले नाही. त्यांची फक्त स्वार्थी राजकारणासाठी बडबड सुरू आहे. मात्र, विरोधकांच्या भूलथापांना जनता भीक घालणार नाही.

माझा विजय निश्‍चित आहे. माझा विजय म्हणजेच जनतेचा विजय आहे, असे प्रतिपादन भाजप-शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. शेंद्रे गटातील आसनगाव येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. पंचायत समितीचे माजी उपसभापती अरविंद चव्हाण, बाजार समितीचे सभापती ऍड. विक्रम पवार, संचालक दत्तात्रय शिंदे, सूर्यकांत पडवळ, सूतगिरणीचे चेअरमन उत्तम नावडकर,सरपंच सौ. सुषमा गायकवाड, हणमंत गुरव, दिलीप यादव, संतोष कदम, प्रदीप जाधव, विजय कदम, संतोष शेळके, पोपटराव धनवडे, राजू साळुंखे आदी उपस्थित होते. त्यानंतर बोरगाव, शेळकेवाडी, मापरवाडी, शेरेवाडी,कुमठे, दूरदेववाडी या गावांना शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांसमवेत भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. प्रत्येक गावात शिवेंद्रराजेंचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले.

पाणी योजना, रस्ते, सांस्कृतिक भवन, अंगणवाडी आदी सुविधा उपलब्ध करून प्रत्येक गावात विकासगंगा पोहोचली आहे. आगामी काळात साताऱ्यात नवीन एमआयडीसी उभारून मेगा प्रोजेक्‍ट आणणार आहे. मतदारसंघातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. स्थानिक विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षणासाठी मेडिकल कॉलेज लवकरच सुरू होणार आहे. लांब पल्ल्याचे रस्ते मुख्यमंत्री सडक योजनेतून मार्गी लावणार आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीचा विचार करून मी लोकहितासाठी धोरण बदलले आहे.

भाजपच्या माध्यमातून या भागातील उर्वरित कामे लवकरच मार्गी लावू, असे आश्‍वासन शिवेंद्रराजे यांनी दिले. भाजपची प्रतिमा स्वच्छ असून त्यांनी देशात व राज्यात अनेक जनहिताचे निर्णय घेतले आहेत. देश अखंड ठेवण्यासाठी नरेंद्र मोदींनी 370 कलम हटवून धाडसी निर्णय घेतला आहे, असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. अरविंद चव्हाण म्हणाले, शेंद्रे गटात भाजपमय वातावरण झाल्याने कार्यकर्त्यांच्या विकासाचे स्वप्न बाबाराजेंच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. शिवेंद्रराजेंच्या प्रचारात युवाशक्ती मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने विरोधी गटात अस्वस्थता आहे. ते सतत लोकांच्या संपर्कात राहून विकासाला प्राधान्य देणारे लोकप्रतिनिधी आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)