माझ्या भूमिकेमुळे न्यू फलटण शुगर वर्क्‍सच्या कामगारांना न्याय

रामराजे; वित्त संस्थांच्या कर्जवसुलीबरोबर शेतकऱ्यांची देणीही मिळणार 

फलटण –  साखरवाडी, ता फलटण येथील न्यू फलटण शुगर वर्क्‍सच्या प्रश्‍नात मी ठोस भूमिका घेतल्यानेच ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांची देणी मिळणार आहेत. कॉसमॉस बॅंकेने तक्रार केल्यानंतर एनसीएलटीने कायद्यातील तरतुदीनुसार केवळ वित्त संस्थांचे पैसे देण्यास बांधील असल्याची भूमिका घेतली होती. त्यावेळी आपण शेतकरी व कामगारांचे प्रतिनिधी म्हणून समितीत दाखल होऊन वित्त संस्थांप्रमाणेच शेतकरी व कामगारांची देणीही प्राधान्याने दिली पाहिजेत, अशी मागणी केल्यानेच या दोन घटकांना न्याय मिळणार असल्याचे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

फलटण-कोरेगाव मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आ. दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ साखरवाडीतील भाजी बाजार मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते. बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, जिल्हा बॅंकेचे संचालक शिवरुपराजे खर्डेकर, माजी सभापती सौ. रेश्‍मा भोसले, श्रीरामचे उपाध्यक्ष नितीन भोसले, सरपंच विक्रम भोसले, सतीश माने, राजेंद्र भोसले, शेतकरी, कामगार उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, न्यू फलटण शुगर गतवर्षीचा हंगाम सुरू करू शकला नाही. त्यापूर्वीच्या हंगामात गाळपास आलेल्या उसाचे पेमेंट आणि कामगारांची थकीत देणी कारखान्याने दिली नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी व 500 हून अधिक कामगारांची कुटुंबे संकटात सापडली. कॉसमॉस बॅंकेने एनसीएलटीकडे आपल्या कर्जाच्या वसुलीसाठी प्रयत्न सुरू केल्याने ऊस उत्पादक व कामगारांच्या देण्यांचा प्रश्‍न निर्माण झाला. त्यामुळे मी एनसीएलटीशी संपर्क करून या दोन घटकांचे प्रतिनिधी म्हणून संबंधित समितीत माझा समावेश करण्याची मागणी केली.

समितीत समावेश होताच कारखान्यासाठी वित्तीय संस्थांप्रमाणे शेतकरी व कामगारांची देणी देण्याची आवश्‍यकता नमूद केली. त्यामुळे या दोन घटकांसह वित्तीय संस्थांची देणी देण्याचा आणि कारखाना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाला. या कारखान्याला गतवैभव मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे. श्रीराम कारखाना बंद पडल्यानंतर सहकार कायद्यातील तरतुदींचा अभ्यास केला. दोन सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून नवी सहकारी संस्था निर्माण करुन त्या माध्यमातून श्रीराम चालविण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये यश येऊन श्रीरामने कोट्यवधींच्या कर्जाची परतफेड केली. ऊस उत्पादक व कामगारांची सर्व थकीत देणी देण्यात आली. या तालुक्‍यात कृष्णेचे पाणी आणण्यासाठी, कमिन्सच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी, शेतमालाला रास्त दर.

शेतकऱ्यांच्या हितासाठी शासकीय योजना राबविण्यासाठी, प्रत्येक कुटुंबाला वीज, पाणी, आरोग्य, रस्ते, शिक्षण या मूलभूत सुविधा मिळण्यासाठी मी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत. फलटण येथे शिक्षणाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार जयकुमार गोरे यांच्यावरही रामराजे यांनी सडकून टीका केली. कारखाना अडचणीत आल्यावर प्रल्हादराव साळुंखे-पाटील व कामगारांना माझी आठवण येते. मात्र, निवडणुकीत विरोधी भूमिका घेऊन अगदी माझ्या भावाचाही पराभव करण्यासाठी ही मंडळी पुढे सरसावतात आणि त्यांना तुम्ही साथ देता, हे दुर्दैवी आहे. त्याउप्परही या तालुक्‍यातील कोणाचेही नुकसान होणार नाही, कोणालाही ते करू देणार नाही, या भूमिकेने मी आतापर्यंत काम केले. तालुक्‍याच्या सर्वांगीण विकासाची भूमिका यापुढेही कायम राहणार आहे. कोणी चुकीची भूमिका घेतली तर त्याला विरोध करणारच, असे त्यांनी ठणकावून सांगितले. शंकरराव माडकर यांनी प्रास्तविकात केले. महेश भोसले यांनी आभार केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)