विरोधकांना माझे खुले आव्हान! कुठल्याही व्यासपीठावर चर्चेस यावे- देवेंद्र फडणवीस

अमरावती: लोकसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर आता या यशाची आगामी विधानसभा निवडणुकीतही पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. एकीकडे संघटनात्मक पातळीवर इतर पक्षातील नेत्यांचे पक्षप्रवेश, बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद या माध्यमातून पक्षाचा पाया भक्कम करण्याचे काम सुरू आहे. तर दुसरीकडे आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरणार आहेत. त्यासाठी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून ते राज्य पिंजून काढणार आहेत.

आज भाजपच्या महाजनादेश यात्रेला सुरवात झाली. या यात्रेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री म्हणाले, ही महाजनादेश यात्रा जनतेने निवडून दिलेल्या सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडण्यासाठी आहे, त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी आहे.

मी असा दावा कधीच केला नाही की ५ वर्षांत सगळ्या समस्या आम्ही पूर्णपणे सोडवल्या, पण मी एवढे नक्की सांगू ईच्छितो की मागील १५ वर्षांपेक्षा दुप्पट काम आम्ही केले. मी विरोधकांना खुले आव्हान देतो, कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करण्यासाठी त्यांनी यावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, विदर्भात उद्योग येत नव्हते म्हणून आम्ही देशातील सगळ्यात मोठा महामार्ग तयार करायचा निर्णय घेतला, पुढील वर्षाअखेरीस हा महामार्ग तयार असेल. शेतकऱ्यांच्या खात्यावर गेल्या पाच वर्षात ५०००० कोटी रुपये दिलेत. गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्रात ३०००० किमी ग्रामीण रस्ते आपण तयार केले. आजपर्यंत कोणत्याही राज्याने एवढे रस्ते तयार केले नाहीत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.