मुंबई – एनसीबीचे मुंबई झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊद असल्याचा दावा मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर आता समीर वानखेडेंचे वडिल समोर आले आहेत. तसेच त्यांनी आपलं नाव ज्ञानदेवच असल्याचं म्हटलं आहे.
याआधी समीर वानखेडेंची दुसरी पत्नी क्रांती रेडकर हिने बाजू मांडली. मात्र आता समीर वानखेडे यांचे पहिले लग्न लावून देणारा मौलानाच समोर आला असून तेव्हा ते मुस्लिमच होते असा दावा केला आहे. यावर ज्या नावावरून वाद वाढला आहे ते दाऊद म्हणजेच ज्ञानदेव वानखेडे समोर आले आहेत.
समीर वानखेडे यांच्या वडिलांना जेव्हा दाऊद नावाविषयी विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, ते एक मोठे लग्न होते. मला उर्दू येत नाही. माझ्या पत्नीने माझे नाव तिथे दाऊद लिहिले असावे. पत्नी मला प्रेमाने दाऊत म्हणत होती. परंतू माझे खरे नाव ज्ञानदेव आहे, दाऊद नाही. मी काहीही लपविलेले नसून मी जन्मापासून हिंदू, असंही समीर वानखेडेच्या वडिलांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी निकाहनामा खरा असल्याचं म्हटलं.
दरम्यान समीर वानखेडेंच्या काकांनी वेगळीच स्टोरी सांगितली होती. ज्ञानदेव हे कुटुंबीयांसमेवत नोकरीनिमित्त जेथे राहायला गेले, तेथे मुस्लीम परिसर असल्याने लोकांमध्ये त्यांचं येणं-जाणं होतं, उठणं-बसणं असायचं. त्यावेळी, तेथील लोकांनी तुम्हाला दाऊद म्हटलं तर चालेल का असं म्हटलं होतं. तेव्हा दाऊद म्हणा, इब्राहीम म्हणा, काहीही म्हणा… मला काही देणंघेणं नाही, असे ज्ञानदेव यांनी म्हटल होतं, अशी आठवण त्यांच्या मोठ्या भावाने सांगितली होती. ते निवृत्त शिक्षक आहेत.