सावरगाव : राज्यातील दोन दसरा मेळाव्यावरून सर्वत्र उत्सुकता पाहायला मिळत आहे. दसरा मेळावे आणि त्यातील भाषणांमधून शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट या दोन्ही बाजूंनी जोरदार शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे या मेळाव्या साठी जय्यत तयारी केली जात आहे. अशातच बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होत आहे. येथील भगवान भक्ती गडावर खासदार प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी मेळाव्याचं आयोजन केलं आहे.
यावेळी एकूणच शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्या जोरदार शक्तीप्रदर्शन आणि जय्यत तयारीवर बोलतांना पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या,’आमचा मेळावा डोंगरात होतो, डोक्यावर ऊन असतं, तरीही लोकांचा उत्साह असतो, असा माझा मेळावा असतो. माझा मेळावा हा पक्षाचा नसून वंचितांचा आहे. मी दसरा मेळाव्याची सर्वांचीच भाषणं ऐकायला उत्सुक आहे, मी दोन्ही शिवसेना नेत्यांची भाषण ऐकणार आहे. त्यानंतर, माझंही भाषण टीव्हीवर ऐकणार आहे.’
त्या पुढे म्हणाल्या,’माझा मेळावा हा गरिबांचा, वंचिताचा असून गावकडचा साधारण मेळावा आहे. इथे ना खुर्च्या लागल्या आहेत, ना खाण्या-पिण्याची व्यवस्था आहे. लोकं आपल्या घरातूनच भाकरी बांधून आणतात. माझ्यासाठी ही वेगळीच ताकद आहे, मला मोठा आशीर्वाद आहे.’ अस म्हणत मुंडे यांनी मुंबईच्या मेळाव्यातील जय्यत तयारीवर अप्रत्यक्षपणे टीका केली.