पुणे – मायबोली मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दरवर्षी राज्यात 1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतो. यंदापासून राज्यात मराठी अस्मितेचा जागर करण्यासाठी शासकीय कामकाजात वापर होण्याच्या दृष्टिकोनातून या पंधरवड्यात जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहेत. सर्व मंत्रालयीन कार्यालये तसेच विभागाच्या अखत्यारीतील सर्व विभागीय कार्यालयांना याबाबत राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने निर्देश दिले आहेत.
राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेली सर्व कार्यालये, मंडळ, उपक्रम, सर्व खासगी व व्यापारी बॅंका, सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये आदी संस्थांना मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.
मराठी भाषा आणि साहित्याबाबत परिसंवाद, कार्यशाळा आणि व्याख्यान आयोजित करणे, ग्रंथप्रदर्शन आयोजित करणे, मराठी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी संवाद लेखकांशी यासारखे विविध उपक्रम राबविण्यात यावेत. विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या मराठी व्यक्तींचा सत्कार व मुलाखती आयोजित कराव्यात. अमराठी भाषिकांसाठी मराठी भाषा शिकण्याचे वर्ग आयोजित करावेत. सोशल मीडियावर मराठी भाषा जागृतीसाठी प्रयत्न करावेत तसेच मराठी सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावेत, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.