मुंबई : क्रुज ड्रग्ज प्रकरणावरून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. त्यातच महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे मुस्लीम असल्याचे सांगत त्यांचा जन्मदाखला सोशल मीडियावर शेअर करून एकच खळबळ उडवून दिली. त्याला आता वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नवाब मलिक यांनी माझा व माझ्या कुटुंबियांचा सोशल मीडियावर अपमान केला आहे. तसेच माझ्या कुटुंबाची खोटी माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसेच आम्हाला अपमानित करणारी वक्तव्ये केली आहेत. यामुळे माझं संपूर्ण कुटुंब प्रचंड तणावात असल्याचं समीर वानखेडे यांनी सांगितलं.
समीर वानखेडे यांनी पत्रक प्रसिद्ध केलं असून त्यांनी म्हटलं की, ‘माझे नाव समीर दाऊद वानखेडे, असे असल्याचे मलिक यांनी ट्विटरवर म्हटले आहे. वास्तविक पाहता, माझ्या वडिलांचे खरे नाव ज्ञानदेव कचरुजी वानखेडे असून ते उत्पादन शुल्क विभागातील निवृत्त वरिष्ठ निरीक्षक आहेत. माझ्या आईचे नाव झहिदा (आता हयात नाही) होते. मी बहु धार्मिक व धर्मनिरपेक्ष भारतीय पारंपरिक कुटुंबातील असून त्याचा अभिमान समीर वानखेडेंनी म्हटलं.
दरम्यान मी २००६ मध्ये डॉ. शबाना कुरैशी यांच्याशी विवाह केला व कायद्यानुसार २०१६ मध्ये घटस्फोटदेखील झाला. त्यानंतर २०१७ मध्ये मी क्रांती दिनानाथ रेडकर यांच्याशी विवाह केला. परंतु मंत्री नवाब मलिक यांच्याकडून सामाजिक माध्यमावर खोटी माहिती पसरवून माझी प्रतिम मलिन करीत आहेत. कुटुंबाची वैयक्तिक माहिती अशाप्रकारे जाहिर करणे हे अपमानित करणारे आहे’, असंही त्यांनी म्हटलं आहे.