- माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम : 146 रॅपिड अँटिजेन तपासणीत 55 बाधित
देहूगाव – देहूगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात आली. परिसरातील 7 हजार 51 कुटुंबातील 21 हजार 524 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. मंगळवारी (दि.22) एक दिवसीय “जनता कर्फ्यू’ला देहूकरांनी प्रतिसाद दिला.
प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “माझे कुटुंब, माझे जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांच्या मार्गदर्शनात देहू ग्रामपंचायतीचे प्रशासक अधिकारी महेश वाघमारे, प्रभारी ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसूरकर यांच्या नेतृत्वात प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, रणजित कांबळे यांच्या नियंत्रणात 10-अंगणवाडी सेविका, 260-शिक्षक, 8-आरोग्य कर्मचारी, 15-आशा कर्मचारी, 4-वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आदींच्या पथकाने परिश्रम घेतले. नोडल अधिकारी, प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांना सहकार्य करीत सामाजिक व विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी योगदान दिले.
प्रत्येक पथकामध्ये 2 असे सुमारे 130 पथक तयार करण्यात आले होते. या पथकांनी 7 हजार 51 कुंटुबीयांच्या घरोघरी भेटी देत 21 हजार 524 जणांची इंन्फ्रारेड थर्मामीटर, थर्मल गण, पल्स ऑक्सीमीटरद्वारे तपासणी करण्यात आले. या वेळी करोना प्रतिबंधासाठी जनजागृती करण्यात आली. परिसरातील सुमारे 90 टक्के नागरिकांची तपासणी मंगळवारी (दि. 22) सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत करण्यात आली. उर्वरित 10 टक्के नागरिकांची बुधवारी अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, आरोग्य सेवक, कर्मचारी यांच्यामार्फत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देहू ग्रामपंचायतीचे प्रशासक अधिकारी वाघमारे यांनी दिली.
देहू प्राथमिक आरोग्य केंद्र, माळवाडी आणि विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या ठिकाणी असणाऱ्या रॅपिड अँटिजेन चाचणी उपकेंद्रावर आरोग्य अधिकारी यांनी बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांसह संशयित व दुर्धर आजार असणाऱ्या सुमारे 146 व्यक्तींची कोविड-19 ची रॅपिड तपासणी करण्यात आली. यामध्ये 55 करोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्यांची भक्तनिवास येथील कोविड केअर सेंटर व होम आयसोलेशन येथे उपचार करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी दिली.
दरम्यान, 146 पैकी 55 रुग्ण बाधित आढळल्याने देहू भक्तनिवास येथील कोविड केअर सेंटरमध्ये 13 जणांना दाखल करण्यात आले असून, 41 जणांना होम आयसोलेशन, तर 91 निगेटिव्ह असणाऱ्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.