पुणे जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख ः मोहिमेला कुंजीरवाडीतून सुरुवात

लोणी काळभोर- करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत व नगरपालिका हद्दीतील नागरिकांची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
या योजनेचा शुभारंभ कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे मंगळवारी (दि. 15) जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

यावेळी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी संदीप कोहिणकर, हवेली पंचायत समितीचे उपसभापती युगंधर काळभोर, सदस्या कावेरी कुंजीर, हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, पोलीस निरीक्षक सूरज बंडगर, कुंजीरवाडीच्या सरपंच सुनिता धुमाळ, उपसरपंच नाना कुंजीर, ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख पुढे म्हणाले, करोनाला दूर ठेवण्यासाठी मागील काही महिन्यांपासून शासकीय यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहे. तरीही करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात पूर्णपणे यश आलेले नाही हे वास्तव आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबातील सर्व नागरिकांची तपासणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत घरोघरी जाऊन शासकीय यंत्रणेमार्फत प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

शासकीय यंत्रणा तपासणी करणार असली तरी, ही योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभागही फार गरजेचा आहे. यामुळे गावपातळीवरील लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन या तपासणीसाठी सहकार्य करण्याची गरज आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कल्पनेतून साकारलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या योजनेमुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची, गावातील प्रत्येक नागरिकांची तपासणी होणार आहे. यामुळे गावातील संशयित करोनाबाधित नागरिकांची माहिती आरोग्य विभागाला मिळणार आहे. या तपासणी दरम्यान आढळलेल्या संशयित रुग्णांची तात्काळ कोविडची तपासणी करण्याचेही नियोजन करण्यात आलेले आहे.
-ऍड. अशोक पवार, आमदार शिरूर-हवेली

Leave A Reply

Your email address will not be published.