राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर माझी शंका- शरद पवार

सरकारला पायउतार करण्यासाठी भुजबळांच्या पाठीशी उभे राहा 

नाशिक: छगन भुजबळ यांनी नाशिकचा चेहरा-मोहरा बदलला आहे. त्यांच्याकडेच नाशिकची संपूर्ण जबाबदारी आहे. त्यामुळे या विकासपुरुषाच्या पाठीशी ठामपणे उभे राहा. तसेच देशातील अर्थव्यवस्था मोडकळीस आलेली असताना उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला पुन्हा खोटे आवतन देणाऱ्या या भाजपा सरकारला हद्दपार करा, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. चोपडा लॉन्स, गंगापूर रोड, नाशिक येथे नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते.

राजकीय गरज भागविण्यासाठी भाजपाने देशात जी आपत्ती आणली आहे, तिचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर माझी शंका आहे. त्यामुळे बूथ प्रमुखांनी सतर्क राहून काम करावे आणि सकाळीच मतदान यंत्रे तपासून घ्यावी. कारण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्या हातातून ती जात असल्याने, भाजपा रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या राज्यांत भाजपाची सत्ता होती, ती राज्ये भाजपाच्या हातातून गेली आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत परिवर्तन होणारच, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की प्रराक्रमी सैन्य आपल्या देशाला लाभले आहे. यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षण खात्याला अधिक बळकटी दिली. या अगोदरही अनेक लढाया झाल्या, मात्र कुठल्याही पक्षीय राजकारणात त्यांचा कधीही वापर गेला गेला नाही. मात्र सध्याचे मोदी सरकार सैन्याच्या कारवाईचेही राजकारण करण्याचा प्रयत्न करते आहे.

देशात प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिक सोळाव्या स्थानी होते आणि मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्यावर नुकत्याच आलेल्या अहवालातून नाशिक गायबच झाले आणि त्याची जागा नागपूरने घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेले नाशिक गायब झाले कुठे, असा सवालही त्यांनी केला.

माझ्यावर कुठलेही आरोप होतात, तेव्हा आधी आरोप समीरवर करायचे असे षडयंत्र विरोधकांनी नेहमीच रचले आहे. माझ्यासोबत समीरलाही अटक करून मला संपवण्याचा कट रचण्यात आला. भुजबळांना कमजोर करायचं असेल तर समीरला कमजोर करा, हे षड्यंत्र आहे. पण मी किवा समीर असल्या कारस्थानांना पुरून उरू. जोपर्यंत कार्यकर्ते आणि नाशिकच्या जनतेचे प्रेम सोबत आहे, तोपर्यंत लढतच राहू, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.