बारामती/ डोर्लेवाडी – गृहमंत्री अमित शहा यांच्या पायगुणाने राज्य सरकार जावं, अशी इच्छा नारायण राणेंनी बोलून दाखवली होती. यावर सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला. माझ्यावर नरेंद्र दाभोलकर यांचे संस्कार झाले आहेत. माझा श्रद्धेवर विश्वास, अंधश्रद्धेवर नाही, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी नारायण राणेंच्या वक्तव्यावर दिली. बारामतीत वयोश्री योजनेच्या कार्यक्रमावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
सुळे म्हणाल्या की, देशाच्या सीमेवरील परिस्थितीपेक्षा दिल्लीत शेतकरी आंदोलनाबाबत भयानकता आहे. केंद्र सरकारने इंधन दरवाढीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काहीतरी निर्णय घ्यावा, हीच अपेक्षा आहे. देशाच्या सीमेवरही परिस्थितीपेक्षा भयानक परिस्थिती दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी निर्माण केली आहे. वास्तविक शत्रूराष्ट्राच्या सीमेवरही केवळ तारा टाकलेल्या असतात. तिथेही सर्वजण प्रेमाने एकमेकांना भेटत असतात. पण आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला एकही शेतकरी दिसला नाही. त्याहीपेक्षा जास्त पोलीस बंदोबस्तच होता.
सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून इंधन दरवाढ आणि कृषी विधेयकांविरोधात आंदोलन करीत आहोत. कआम्ही सातत्याने याबद्दल आवाज उठवत आहोत. केंद्र सरकारला याबद्दल जाग येवून संवेदनशीलपणे इंधन दरवाढीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काहीतरी निर्णय घ्यावा.
वयोश्री योजनेत देशात बारामती लोकसभा मतदारसंघ पहिल्या क्रमांकावर आहे. दिव्यांगासाठी पहिल्या टप्प्यात 140 सायकली वाटप केल्या आहेत. या योजनेचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणार आहे. एप्रिलमध्ये दिव्यांगांसाठी शिबिर, दिव्यांगांसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणार आहे.