माझी लढाई पाण्यासाठी, दुष्काळ हटविण्यासाठी

जयकुमार गोरे; “आमचं ठरलयं’वाले एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसतील

सातारा – माझा निवडणूक अर्ज भरताना वरुणराजानेही दमदार हजेरी लावली. विरोधी “ठरलयं’वाल्यांची घाण पावसाने धुऊन निघाली आहे. निवडणुकीत माझी लढाई त्यांच्यासारख्या लायकी नसलेल्या विरोधकांशी नाही, तर माझी लढाई पाण्याची आणि दुष्काळ हटविण्यासाठी आहे, असे माण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयकुमार गोरे यांनी सांगितले. “ठरलयं’वाले स्वार्थासाठी एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजपकडून अर्ज भरल्यानंतर दहिवडी बाजारपटांगणावर आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, बहुजन नेते गोपीचंद पडळकर, प्रभारी सदाशिव खाडे, धैर्यशील कदम, टी. आर. गारळे, महेश लोखंडे, बाळासाहेब मासाळ, विकल्प शहा, दहिवडी, वडूज, म्हसवडचे पदाधिकारी, नगरसेवक, शिवसेना, आरपीआय, रासप आणि टीम जयकुमारमधील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोरे म्हणाले, “”मतदारसंघाच्या पाणीप्रश्‍नासाठी चोवीस तासातील प्रत्येक मिनिट परिश्रम करत आलो आहे. संपूर्ण मतदारसंघच कुटुंब मानून गेली दहा वर्षे रात्रंदिवस झटलो. तेव्हा 97 गावांमध्ये उरमोडीचे पाणी पोहचविण्यात यश आले. मात्र, काविळ झालेल्या विरोधकांना मी आणलेले पाणी दिसत नाही.

लोधवडेकर, निमसोडकर, पळशीकर मी आणलेल्या पाण्याचा लाभ घेऊनही पाणी कुठे आहे, असे विचारतात. मी एकटा कधीच ऐकणार नाही, म्हणूनच माझ्याविरोधात वेगवेगळ्या रक्तगटाचे भंपक लोक एकत्र आहेत. ते एकत्र राहूच शकत नाहीत. ठरलयंवाल्यांची उमेदवारी अद्याप ठरली नाही. नाईलाजाने एक नाव जाहीर करताना बाकीच्यांना सुतक आले.” मी जे बोलतो ते करुन दाखवतोच, माझा हेतू प्रामाणिक आहे आणि माझ्या मतदारसंघातील जनतेचे माझ्यावर प्रेम आहे हे समजल्यानेच भाजपने माझ्यावर विश्‍वास टाकला. भाजपने मला उमेदवारी दिली, त्यामुळे आता राजकीय संन्यास कोण कोण घेणार, असा सवाल त्यांनी केला.

“इथल्या मातीच्या स्वाभिमानासाठी, जनतेसाठी, मायभगिनींसाठी आणि तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करण्याची लढाई लढतोय. गावोगावी जात मी केलेल्या कामांचा हिशोब मांडतोय. जनतेची मते आणि अपेक्षा जाणून घेतोय, असे सांगून श्री. गोरे यांनी “संधी असूनही मतदारसंघासाठी काहीही न करणारा आणि पवारांच्या आदेशाने चालणारा लोधवडेकर सुतकी चेहरा घेऊन “ठरलयं’वाल्यांच्या गोटात काय करत होता, तो मुख्यमंत्र्यांकडे कशासाठी गेला होता, हे एकदा त्याने जनतेसमोर सांगावे, असे आव्हान दिले. मी आणलेले उरमोडीचे पाणी पळशीतून जाते की नाही ते संध्याकाळीच पाण्याचा संपर्क येणाऱ्याने सांगावे. ठरलयंवाल्यांनी त्यांच्या गावातील रस्ते, बंधारे आणि इतर विकासकामे मी केलीत की नाही तेही एकदा सांगाव, अशी टीका त्यांनी केली.

ठरलयं नाही, तर “अलामचं इस्कटलय’
मला अडविण्यासाठी “आमचं ठरलयं’ म्हणत एकत्र आलेले मतदारसंघाच्या विकासासाठी एकत्र आले नाहीत आणि भविष्यातही येणार नाहीत. याच स्टेजवरुन आम्ही एकत्रच आहोत, असे म्हणणाऱ्यांचे आता उमेदवारीवरुन बिनसले आहे. त्यांचा त्यांच्यातच मेळ बसेना झाला आहे. कुणाचा चेहरा सुतकी झाला आहे तर कुणाची बोलतीच बंद झाली आहे. त्यांचं ठरायच्या अगोदरच इस्कटलं, असा टोला जयकुमार गोरेंनी लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.