मुंबई : महायुती पाठोपाठ महाविकास आघाडीने ही निवडणूक जाहीरनाम्यात पंचसूत्रीची घोषणा केली आहे. यात महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3000 रूपये देण्यात येणार आहेत. त्याच बरोबर महिलांना मोफत बस प्रवास देण्यात येणार आहे. या पंचसूत्रीमध्ये महिला, शेतकरी, बेरोजगार तरूण यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.
मुंबई येथील बीकेसी मैदानावर बुधवारी महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची पंचसूत्री जाहीर करण्यात आली. यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले उपस्थित होते.
राहुल गांधी म्हणाले, निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय, प्राप्तीकर विभाग यांचा वापर करुन महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात आले. महाविकास आघाडीचे सरकार हे इंडिया आघाडीचे सरकार होते. हे सरकार पाडण्यासाठी पैसे देऊन लोक विकत घेतले गेले. कारण काही व्यावसायिकांची मदत भाजपला करायची होती. मुंबईतील धारावीची जमीन ही एक लाख कोटींची आहे. ही गरीबांची जमीन आहे. ही जमीन गरीबांकडून हिसकावली जाते आहे.
सगळ्या जगाला हे सत्य आता समजले आहे. जगासमोर ही जमीन अदाणींना दिली जाते आहे. जे प्रकल्प होते मग ती अॅपलची फॅक्टरी असो, बोईंगचं युनिट असो येथे येणारे व्यवसाय दुसऱ्या राज्यांमध्ये पाठवण्यात आले, असाही आरोप त्यांनी केला.राज्यातील तरुणांना रोजगार मिळाला असता, पण एकामागोमाग एक प्रकल्प हिसकावले जात आहेत.
१ लाख कोटींची जमीन हिसकावण्यात येते आहे. तसेच पेट्रोल, गॅस यांच्या किंमती वाढल्या आहेत. प्रत्येक कुटुंबाकडून दरवर्षी ९० हजार रुपये काढून अदाणी-अंबानींना दिले जातात. नंतर सांगितले जाते की महिलांना १५०० रुपये देणार. मात्र यांची नियत चांगली नाही. हे सगळे अदाणी आणि अंबानींची मदत करणारे लोक आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.
महाविकास आघाडीच्या 5 प्रमुख घोषणा
1. महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास.
2. शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन.
3. जातनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील.
4. 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत औषधे.
5. बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4000 रुपयांपर्यंत मदत.