MVA Seat Sharing । महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठं यश मिळवलं. लोकसभेच्या 48 जागांपैकी 30 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. महायुतीच्या पारड्यात केवळ 17 जागा गेल्या. लोकसभेच्या निवणुकीतील मविआला मिळालेल्या या यशामध्ये त्यांच्या मित्रपक्षांचा मोठा पाठिंबा होता. याच पाठिंब्याची आठवण करून देण्यासाठी आता विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांनी काही जागांची मागणी केलीय. मविआतील तीन प्रमुख पक्षांना प्रत्येकी 96 जागा या प्रमाणं जागा वाटप होण्याच्या चर्चा सुरु असतानाच त्यांच्या मित्रपक्षांनी देखील त्यांची भूमिका जाहीर केलीय. लोकसभेला मविआला पाठिंबा देणाऱ्या माकपने काँग्रेसकडे 12 जागांचा प्रस्ताव दिला असल्याचे सांगण्यात येतंय.
माकपला किमान 12 जागा द्याव्यात MVA Seat Sharing ।
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला माकपने जाहीर पाठिंबा दिला होता. विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात व राज्यात तीव्र होत असलेल्या शेतकरी, शेतमजूर व कामगार कर्मचाऱ्यांच्या तीव्र होत असलेल्या विविध प्रश्नांबाबत आज माकपच्या शिष्टमंडळाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ज्येष्ठ नेते नरसय्या आडम व उदय नारकर यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. यामध्ये आमदार विनोद निकोले, माजी आमदार जे.पी.गावीत, डॉ. डी.एल.कऱ्हाड, डॉ. अजित नवले, शैलेंद्र कांबळे यांचा शिष्टमंडळात समावेश होता. लोकसभा निवडणुकीत दिलेल्या राज्यभरातील माकपच्या भरीव योगदानाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत माकपला किमान 12 जागा महाविकास आघाडीने सोडाव्यात यासाठीचा प्रस्ताव आज माकपच्या वतीने त्यांना देण्यात आला. .
माकपकडून या जागांचा प्रस्ताव MVA Seat Sharing ।
डहाणू व विक्रमगड (पालघर), शहापूर (ठाणे), कळवण, नाशिक (पश्चिम), दिंडोरी आणि इगतपुरी (नाशिक), सोलापूर (मध्य), अकोले (अहमदनगर), माजलगाव (बीड), किनवट (नांदेड) आणि पाथरी (परभणी) हे विधानसभा मतदार संघ लढविण्याची जोरदार तयारी माकपने सुरू केली आहे. पक्षाच्या वतीने याबाबतचा प्रस्ताव आज सादर करण्यात आला. मागील आठवड्यात शरद पवार यांचीही माकपच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. लवकरच उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली जाणार आहे.
दरम्यान, मविआकडून येत्या विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांना किती जागा देण्यात येणार हे येत्या काही दिवसात निश्चित होईल. पण काँग्रेसच्या दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मविआ म्हणून लढवण्याची निश्चित करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आहे.
हेही वाचा
पोषण आहारात आढळली मेलेली चिमणी; चिमुकल्यांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर