पाच वर्षांत म्युच्युअल फंडांकडील निधी जाणार 50 लाख कोटींवर

म्युच्युअल फंड उद्योगाकडे व्यवस्थापनासाठी असलेली संपत्ती येत्या पाच वर्षांत 50 लाख कोटी रुपयांवर जाईल, असा अंदाज क्रिसिलने व्यक्‍त केला आहे. क्रिसिल ही विश्‍लेषण, संशोधन, जोखीम आणि धोरणात्मक सल्ला सेवा, तसेच अर्थविषयक मानांकन देणारी कंपनी असून अमेरिकेतील एस अँड पी ग्लोबल कंपनीची भारतातील उपकंपनी आहे.

सध्या म्युच्युअल फंडांकडे व्यवस्थापनासाठी 30 लाख कोटी रुपयांची रक्‍कम आहे. बचतीचे अर्थकारण आणि प्रति-व्यक्‍ती वाढते उत्पन्न यामुळे पाच वर्षांत या रकमेत वीस लाख कोटींची वाढ होईल, अशी चिन्हे आहेत.

क्रिसिल इंडियाच्या इन्व्हेस्टमेंट रिसर्च कॉनक्‍लेव्हमध्ये क्रिसिलच्या व्यवस्थापकीय संचालक आशू सुयश यांनी हा अंदाज वर्तवला आहे. त्या म्हणाल्या की, यामध्ये इक्‍विटी फंड योजना आघाडीवर राहून ही वाढ होण्यास मदत करतील. जागतिक पातळीवरील म्युच्युअल फंडांप्रमाणेच देशात इक्‍विटी फंड योजनांचा वाटा 42 टक्‍क्‍यांवरून 47 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचेल. निर्देशांकाशी जोडलेले पॅसिव्ह फंडदेखील यात पूरक भूमिका बजावतील. भारतीयांच्या बचतीच्या हिश्‍श्‍यात म्युच्युअल फंड योजनांनी गेल्या दोन दशकांमध्ये स्वतःची जागा तयार केली आहे.

कल्पकतेला महत्त्व
कोटक महिंद्रा असेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शहा यांच्या मते, म्युच्युअल फंड उद्योगाचे भविष्य उज्ज्वल दिसत असून कल्पक उत्पादनांबरोबरच ग्राहकांचा विश्‍वास प्राप्त केला आणि छोट्या शहरांमधील गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचता आले तर सध्या फंडाकडे असलेल्या अडीच कोटी ग्राहकांचा आकडा 25 कोटींवर जाईल. ग्राहकांपर्यंत किती गोष्टी पोहोचवायच्या आणि उघड करावयाच्या याबाबत नियामक सेबी आणि म्युच्युअल फंड कंपन्यांनी निश्‍चिती केली पाहिजे.

अतिमाहितीमुळे गुंतवणूकदारांच्या मनात अनावश्‍यक शंका निर्माण होतात, असे ते म्हणाले.
म्युच्युअल फंड योजनांकडील ठराविक रक्‍कम विकासासाठी आणि छोट्या शहरातील नव्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ठेवण्याचा सेबीचा निर्णय हा मास्टरस्ट्रोक असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. गुंतवणूकदारांमध्ये आता जागरूकता वाढत असल्याने शेअरबाजारातील चढ-उतार ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे आणि हा बाजाराच्या वाटचालीचा भाग असल्याची जाणीव म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांना होऊ लागली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.