मुंबई – म्युच्युअल फंडांच्या टेलीविजनवरील जाहिराती चकचकीत असतात. मात्र जोखीमीसंदंर्भातील डिसक्लेमर अतिशय वेगात काही सेकंदात सांगितले जाते. डिस्केमर जाहिराती प्रमाणेच स्पष्ट आणि आकर्षक स्वरूपात दाखविण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे.
जर 37 लाख कोटी रुपयांची मालमत्ता हाताळणाऱ्या म्युच्युअल फंड उद्योगाने या सूचनांची अंमलबजावणी केले नाही तर त्यासाठी आवश्यक ते नियम करण्यास आपण मागेपुढे पाहणार नाही, असे गोयल यांनी राष्ट्रीय शेअर बाजाराने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सांगितले. लोक कष्टाचे पैसे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवितात. त्यामुळे डिसक्लेमर मधील माहिती त्यांना स्पष्ट स्वरूपात माहीत होणे गरजेचे आहे.
आपण कोणत्या फंडात गुंतवणूक करीत आहोत आणि त्यामध्ये काय जोखीम आहे याची स्पष्ट माहिती मिळणे गरजेचे आहे. शेअर बाजारासंदर्भातील विविध योजनासंदर्भात एक समान केवायसी असण्याची गरज आहे. त्यामुळे गुंतागुंत टळू शकेल. शेअर बाजारांनी या सूचनेवर विचार करावा असा आग्रह गोयल यांनी केला.