रिझर्व्ह बॅंकेकडून 50 हजार कोटींची भांडवल सुलभता
मुंबई : प्रदीर्घ लॉक डाऊनमुळे भांडवल बाजाराची परिस्थिती बिघडली असल्यामुळे त्याचा परिणाम म्युच्युअल फंडावर होऊ लागला आहे. काही म्युच्युअल फंडांनी आपल्या योजना बंद करण्याचा विचार चालू केला आहे. अशा परिस्थितीत या उद्योगाला आधार देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने 50 हजार कोटी रुपयांची भांडवल सुलभता त्यांना उपलब्ध केली आहे.
रिझर्व बॅंकेने या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भांडवल बाजारातील अनिश्चिततेमुळे म्युच्युअल फंडावर दबाव आला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडातून गुंतवणूक काढून घेण्याची शक्यता वाढली आहे. अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडांना निधीची चणचण भासू नये यासाठी ही भांडवल सुलभता उपलब्ध करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात फ्रॅंकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंडाने आपल्या कर्जरोखे आधारित 6 योजना बंद करीत असल्याचे सांगितले होते.
या परिस्थितीचा म्युच्युअल फंडावर आणखी काही परिणाम झाला तर त्यांना मदत करण्यासाठी रिझर्व बॅंकने आणखी उपायोजना करण्याची शक्यता खुली ठवली आहे.
जुलै 2013 मध्येही रिझर्व बॅंकेने म्युच्युअल फंडांना तात्पुरती 25 हजार कोटी रुपयांची मदत केली होती. त्याचबरोबर 2008 मध्ये जागतिक वित्तीय बाजार अस्थिर झाल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने अशी मदत केली होती. रिझर्व बॅंकेने सुरू केलेल्या योजनेअंतर्गत म्युच्युअल फंडासाठी एका निश्चित रेपोदरावर 90 दिवसासाठी भांडवल उपलब्ध होऊ शकेल. ही योजना सुरू झाली असून ती 11मे पर्यंत चालणार आहे.
वित्तीय तुटीवर दबाव
कर भरणा कमी झाला आहे. सरकारला कर्ज घेण्यासाठी मर्यादा आहेत. त्याचबरोबर उद्योगधंद्यांना सवलती द्याव्या लागणार आहेत. याकरिता सरकार उत्पन्न मर्यादेच्या बाहेर जाऊन खर्च करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात वित्तीय तूटीवर दबाव राहणे अपेक्षित असल्याचे रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे. बऱ्याच अर्थतज्ञ आणि पतमानांकन संस्थांनी सध्याच्या परिस्थितीत काही प्रमाणात तूट वाढू देण्यास हरकत नसल्याचे सुचविलेले आहे.
टेम्पलटन गुंतवणूकदारांचे पैसे परत करणार
दरम्यान कर्जरोखे आधारित 6 योजना बंद केल्या असल्या तरी संबंधित गुंतवणूकदारांचे पैसे शक्य तितक्या लवकर परत करण्याचा प्रयत्न केला जाईल असे फ्रॅंकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंडाने म्हटले आहे. या कंपनीचे अध्यक्ष संजय सप्रे यांनी सांगितले की, गुंतवणूकदारांनी कसलीही काळजी करू नये. हे पैसे देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
शेअर निर्देशांकात वाढ रिझर्व बॅंकेने म्युच्युअल फंडासाठी 50 हजार कोटी रुपयांची भांडवल सुलभता उपलब्ध केल्यानंतर त्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला आणि निर्देशांकामध्ये वाढ झाली. सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 415 अंकांनी वाढून 31,743 अंकावर बंद झाला व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 127 अंकांनी वाढवून 9,282 अंकांवर बंद झाला.