कोची : काही गुंडांनी केलेल्या हल्ल्यामध्ये मुथ्थुट फायनान्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जॉर्ज अलेक्झांडर मुथ्थुट हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोरांनी आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आयजी ऑफिसच्या समोर मुथ्थुट यांच्या वाहनावर दगडांनी हल्ला केला होता.
डिसेंबर महिन्यात कंपनीने देशभरातील 160 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले. त्या निर्णयाविरोधात मुथ्थुट व्यवस्थापनाविरोधात कर्मचाऱ्यांचा एक गट आंदोलन करत आहे. “सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स’ अर्थात “सिटू’ या संघटनेशी संबंधित गतांकडून हे आंदोलन केले जात आहे.
“सिटू’च्या गुंडांनीच हा हल्ला केला असल्याचा आरोप मुथ्थुटच्या व्यवस्थापनाने केला आहे. मात्र “सिटू’ने हा आरोप फेटाळला आहे. अशा प्रकारच्या हिंसक पद्धतीवर आमचा विश्वास नाही, असे “सिटू’चे नेते अनंतलावट्टम आनंदन यांनी माध्यमांना सांगितले.