मुठा नदीतील बांध काढणे सुरू; ठेकेदारावरही कारवाई करणार

पुणे – पावसाळ्याच्या तोंडावर मुठा नदीचे पात्र अडवून राजाराम पुलाखालील बाजूस नदीत टाकलेला मातीचा बांध काढण्याचे आदेश महापालिका अतिरिक्‍त आयुक्‍त रूबल अग्रवाल यांनी सोमवारी दिले. तातडीची गरज नसतानाही, राजाराम पुलाखालील बांध घालण्यात येत असल्याची बाब दैनिक “प्रभात’ने उघडकीस आणली होती. याची गंभीर दखल घेत महापालिकेने एका दिवसात नदीचे पात्र अडथळा विरहीत करण्याच्या सूचना ठेकेदारास देण्यात आल्या आहेत.

ऐन पावसाळ्यात महापालिका प्रशासनाकडून मुठा नदीत चक्क बांध घालण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, नदीपात्रातील माती काढूनच तेथे बांध उभारण्यात आला आहे. तर, नदीतून पाण्याचा प्रवाह सुरू असावा, यासाठी चार पाइप टाकण्यात आले आहेत. येथील आर्ट प्लाझाच्या कामासाठी हा “घाट’ घालण्यात आला आहे. हे काम संबंधित ठेकेदाराला कर्वेनगरच्या बाजूने सुरू करायचे आहे. मात्र, त्या बाजूने नदीपात्रात जाण्यासाठी रस्ता नसल्याने तसेच जायचे झाल्यास एखाद्या मंगल कार्यालयाच्या खासगी जागेतून जावे लागणार आहे. त्यावर पर्याय म्हणून संबंधित ठेकेदाराने थेट नदीतच बांध घातला आहे.

नदीत बांध उभारण्याच काम थांबविण्यात आले असून संबंधित ठेकेदारास बांध तसेच नदीतील राडारोडा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पावसाळ्यात अशा प्रकारे काम का सुरू करण्यात आले? याचा खुलासाही मागविण्यात आला असून ठेकेदारास नोटीस बजाविली आहे.
– रूबल अग्रवाल, अतिरिक्‍त आयुक्त, महापालिका.

काम थांबविण्याच्या सूचना
महापालिका प्रकल्प विभागाचे प्रमुख श्रीनिवास बोनाला यांनी सोमवारी सकाळी या प्रकाराची माहिती घेतली. ठेकेदाराला सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या मागील बाजूस काम करण्याच्या सूचना दिल्या असताना त्यांच्याकडून बांध घालून पलिकडे काम केल्याचे यावेळी समोर आले. त्यामुळे ठेकेदारास तातडीने काम थांबविण्याच्या सूचना दिल्या असून सोमवारी रात्रीपर्यंत बांध काढण्याच्या सूचना केल्याल्याचे बोनाला यांनी सांगितले. तसेच हे काम पावसाळा संपल्यानंतरच हाती घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)