#MustaqAliT20 : अंतिम सामन्यात कर्नाटकचा तामिळनाडूवर एका धावेने विजय

सलग दुस-यांदा जिंकला सईद मुश्ताक अली टी-२० चषक

सूरत : कर्णधार मनीष पांडेची नाबाद अर्धशतकी खेळी आणि फिरकीपटू गौतमने अखेरच्या षटकात केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर कर्नाटकने अंतिम सामन्यात तामिळनाडूचा ०१ धावेने पराभव करत सलग दुस-यांदा सईद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटाकावले.

विजयासाठी १८१ धावांचा पाठलाग करताना तामिळनाडूचा संघ २० षटकांत ६ बाद १७९ धावसंख्येपर्यतच मजल मारू शकला. तामिळनाडू संघास अखेरच्या षटकात १३ धावांची आवश्यकता होती. रविचंद्रन अश्विनने गौतमच्या पहिल्या २ चेंडूवर चौकार लगावले. त्यानंतर ४ चेंडूत ५ धावांची गरज असताना गौतमने केवळ ३ धावा दिल्या. या दरम्यान पाचव्या चेंडूवर विजय शंकर धावबाद झाला. शेवटच्या चेंडूवर ३ धावांची गरज असताना केवल बायच्या स्वरूपात १ च धाव मिळाल्याने तामिळनाडूला पराभव स्विकारावा लागला.

तामिळनाडूकडून फलंदाजीत विजय शंकरने सर्वाधिक ४४ तर बाबा अपराजितने ४० धावांची खेळी केली.

तत्पूर्वी, तामिळनाडूने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्विकारत कर्नाटकला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकने २० षटकांत ५ बाद १८० अशी मजल मारली. कर्नाटककडून मनीष पांडेने ४५ चेंडूत सर्वाधिक ६० धावा केल्या तर रोहन कदमने ३५, देवदत्त पड्डिकलने ३२ आणि करूण नायरने ८ चेंडूत १७ धावा केल्या.

तामिळनाडूकडून गोलंदाजीत रवीचंद्रन अश्विनने ४ षटकांत ३४ धावा देत २ गडी बाद केले तर मुर्गन अश्विनने ३ षटकांत ३३ धावा देत २ गडी बाद केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.