मेरठ (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशातील पहिल्या टप्प्यातील मतदान 10 फेब्रुवारीला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 14 फेब्रुवारीला होणार असून उत्तर प्रदेशातील पश्चिम भागातील 113 जागांवरील लढतीचे भवितव्य मतदान यंत्रांमध्ये बंद होणार आहे. यातील अनेक जागांवर मुस्लिम मतांचा प्रभाव असल्याने भारतीय जनता पक्ष सोडून बाकीच्या पक्षांनी मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवण्यावर भर दिलेला आहे. या 113 जागांवर एकूण 127 मुस्लिम उमेदवार नशीब अजमावत आहेत.
या ठिकाणी पहिल्या टप्प्यात 11 जिल्ह्यांमधील 58 जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात नऊ जिल्ह्यांमधील 55 जागांवर मतदान होणार आहे. या ठिकाणी समाजवादी पक्ष- राष्ट्रीय लोकदल युती, बहुजन समाज पक्ष, ओवेसीचा एमआयएम या पक्षांनी मिळून 127 मुस्लिम उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे. पहिल्या टप्प्यातील 50 जागांवरील तर दुसऱ्या टप्प्यातील 77 जागांवरील मुस्लिम उमेदवारांचे भवितव्य निश्चित होणार आहे. विशेष म्हणजे गेल्यावेळी पहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या 58 पैकी 53 जागांवर भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला होता तर दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या 55 पैकी 38 जागा भाजपने खेचून आणत मुस्लिम मतांचा प्रभाव निष्प्रभ ठरवला होता.
यावेळी मात्र हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण करण्यात भाजपला यश मिळाल्याचे चित्र दिसत नाही. काही प्रमाणात जाट विरुद्ध मुस्लिम असे चित्र निर्माण करण्याचा भाजपने प्रयत्न केला. भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणातून ही बाब दिसून आली. मात्र शेतकरी आंदोलनाचा मोठा प्रभाव पश्चिमी उत्तर प्रदेशात असल्याने आणि जाट शेतकरी हा या आंदोलनाबरोबर असल्याने भाजपच्या प्रयत्नांना कितपत यश येणार हा प्रश्न आहे. त्याखेरीज यावेळी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि जाटांमध्ये प्रभाव असणारे राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांनी एकत्रितपणे प्रचार केल्याने भाजपसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
उत्तर प्रदेशातील पश्चिम भागातील मुरादाबाद शहर, मुरादाबाद ग्रामीण, मेरठ सदर, रामपूर सदर, संभल, कुंदरकी, अमरोहा, धौलाना, बेहट, सहारनपूर ग्रामीण या जागांवर मुस्लिम मतदारांची संख्या 57 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यातील मुरादाबाद शहर मतदारसंघात समाजवादी पक्षाचे युसुफ अन्सारी, बसपाचे इरशाद हुसेन आणि काँग्रेसचे रिजवान कुरेशी रिंगणात आहेत. मेरठ सदरमध्ये सपाने विद्यमान आमदार रफिक अन्सारी यांना तर बसपाने दिलशाद शौकत यांना तिकीट दिले आहे. रामपूर सदरमध्ये सपाने त्यांचे प्रसिद्ध नेते आझम खान यांना उतरवले आहे तर बसपाचे सदाकत हुसैन रिंगणात आहेत. काँग्रेसकडून नवाब तालिम खान लढत आहेत. संभलमध्ये सपाचे इक्बाल महमूद, काँग्रेसच्या निदा अहमद आणि बसपाचे शकील अहमद रिंगणात आहेत. मुरादाबाद ग्रामीणमधून मागीलवेळी सपाचे हाजी इकराम कुरैशी विजयी झाले होते. त्यांना तिकीट नाकारल्याने ते यावेळी काँग्रेसच्या तिकीटावर लढत आहेत तर बसपाकडून अकिल चौधरी रिंगणात आहेत. अमरोहा, धौलाना, बेहट, सहारनपूर ग्रामीण अशा मतदारासंघात अशीच स्थिती आहे. मुस्लिम उमेदवारांमध्येच तिरंगी लढती होऊन मतविभागणी होईल आणि त्याचा फायदा भाजप उमेदवारांना होईल, असा भाजपच्या निवडणूक तज्ज्ञांचा अंदाज आहे.
• उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या 403 पैकी 143 जागांवर मुस्लिम मतदारांचा प्रभाव
• त्यापैकी 70 जागांवर मुस्लिम लोकसंख्या 20 ते 30 टक्के.
• 43 जागा अशा आहेत की ज्याठिकाणी मुस्लिम लोकसंख्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
• 36 जागांवर मुस्लिम उमेदवार स्वतःच्या ताकदीवर निवडून येऊ शकतात.
• 107 जागांवरील निकाल मुस्लिम मतदारांवर अवलंबून असतो.
• सध्याच्या विधानसभेत केवळ 23 मुस्लिम आमदार निवडून आले होते. गेल्या 50 वर्षातील हा निचांक आहे.