नवी दिल्ली : कर्नाटक सरकारच्या एका निर्णयामुळे राज्यासह देशात नव्या वादाची ठिणगी पडणार असल्याचे दिसत आहे. कर्नाटकच्या काही भागांत हिंदू मंदिरांच्या उत्सवांमध्ये मुस्लीम व्यापाऱ्यांनी सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. यावरूनच आता राज्यातील राजकैय वर्तुळात एकच गोंधळ निर्माण झाला असून भाजपा नेत्यानेच सरकार विरोधात असंतोष व्यक्त केला आहे. त्यांनी लोकशाहीविरोधी आणि वेडेपणाची ही कृती असल्याचे म्हटले आहे. या सोबतच हे सगळं हिंदुत्वाचे समर्थक असलेल्या समुहांच्या इशाऱ्यावर चालले असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.
राज्यात नुकतेच विश्व हिंदू परिषद, हिंदू जागरण वैदिक, बजरंग दल आणि श्रीराम सेना यांच्या मागणीनंतर उडुपी आणि शिवमोग्गामधल्या काही मंदिरांमध्ये होणाऱ्या सोहळ्यांदरम्यान मुस्लीम व्यापाऱ्यांना सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. यानंतर आता राज्यातल्या इतर भागांमधूनही अशा प्रकारची मागणी होऊ लागली आहे. तर राज्य सरकारचे म्हणणे आहे की,”मंदिरांमध्ये मुस्लीम व्यापाऱ्यांवरची बंदी २००२ मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात लागू करण्यात आली होती”. मात्र भाजपा सरकारच्या काळात झालेल्या या निर्णयाचा त्यांच्याच पक्षाचे आमदार एएच विश्वनाथ आणि अनिल बेनाके यांनी विरोध केला आहे.
विश्वनाथ म्हणाले,”हा वेडेपणा आहे. कोणताच देव आणि धर्म ही शिकवण देत नाही. या प्रकरणी राज्य सरकारने हस्तक्षेप करायला हवा. मला कळत नाही, सरकार या मुद्द्यावर गप्प का आहे? मला कळत नाहीये की हे कोणत्या आधारावर मुस्लीम व्यापाऱ्यांना लक्ष्य करत आहेत? ही परिस्थिती अत्यंत खेदजनक आहे. सरकारने या प्रकरणात कारवाई करावी अशी लोकांची प्रतिक्रिया आहे.