महिलेचे कपडे फाटत केला लैंगिक छळ
अलवार: रामाच्या नावाचा जयजयकार न केल्याने बसस्थानकात जेवण करत असणाऱ्या मुस्लिम दाम्पत्यास मारहाण करत, महिले सोबत गैरवर्तन करण्याचा प्रकार शनिवारी रात्री अलवार शहरात घडला आहे.
मुस्लिम दाम्पत्य हरयाणाला जात असताना अलवारच्या बस स्थानकात दोन तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. या तरुणांनी महिलेचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत तिच्यासोबत गैरवर्तन केलं आहे.
अलवारच्या बस स्थानकात मुस्लिम दाम्पत्य त्यांच्या मुलासह जेवण करत असताना दोन तरुण त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी या दाम्पत्याला रामाचा जयजयकार करण्यास सांगितलं. त्यानंतर या तरुणांनी पतीला मारहाण केली आणि महिलेशी असभ्य वर्तन केलं असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान वंश भारद्वाज आणि सुरेंद्र भाटिया अशी या मुस्लिम दाम्पत्याला मारहाण करणाऱ्यांची नावं असल्याची माहिती मिळत आहे. भारद्वाज आणि भाटिया यांनी मारहाण करताच मुस्लिम दाम्पत्यानं मदतीसाठी आरडा ओरडा केला. त्यामुळे परिसरातील काही नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि मारहाण करणाऱ्या तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.