चेन्नई – ख्यातनाम संगीतकार इलायराजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर इलायराजा यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात असे दोन गट उभे ठाकले आहेत.
ब्लूक्राफ्ट डिजीटल फौंडेशनने प्रकाशित केलेल्या “आंबेडकर ऍन्ड मोदी, रिफॉर्मर्स आयडियाज, परफॉमर्स इंप्लिमेंटेशन’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये इलायराजा यांनी ही तुलना केली आहे. या प्रस्तावनेमध्ये इलायराजा यांनी “बेटी बचाओ, बेटी पढाओ’ सारख्या उपक्रमांचेही कौतुक केले आहे.
मात्र त्यांनी केलेल्या या तुलनेवर सोशल मीडियातून जोरदार टीका व्हायला लागली आहे. मोदींची तुलना डॉ. आंबेडकरांशी होऊ शकत नाही. मोदी हिंदुत्ववादी आहेत. तर डॉ. आंबेडकरांनी आपले सर्व आयुष्य वंचित आणि दलितांच्या उद्धारासाठी खर्च केले, असा युक्तिवाद विरोधक करत आहेत.
तर मोदी आणि डॉ. आंबेडकर हे दोघेही सामाजिक मागास गटातील असून या दोघांनीही आपल्या कामातूनच सुधारणा घडवून आणल्या आहेत, असे मोदींच्या समर्थकांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर मोदींना अंमलबजावणी केलेल्या योजनांप्रमाणेच तिहेरी तलाक विरोधी कायद्यामुळे डॉ. आंबेडकरांनाही आनंदच वाटला असता, असाही दावा केला जाऊ लागला आहे.