कोल्हापूर (प्रतिनिधी): कोरोनामुळे छोटेखानी विवाह समारंभ झालेत. ५० नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह करण्यास परवानगी दिलेली आहे. या ५० लोकांमध्ये वाजंत्रींचा समावेश केल्यास, विवाह सोहळ्यात वाद्ये वाजवण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिली.
विवाह समारंभात अनेकजण एकत्र येत असतात. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होणे कठीण असते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे विवाह समारंभावर यावर्षी गदा आली. केवळ ५० नातेवाईकांच्या उपस्थितीत छोटेखानी विवाह समारंभ पार पाडत आहेत. परिणामी विवाह समारंभात वाद्ये वाजणे बंद झाले होते. वाजंत्री व्यावसायिक आर्थिक संकटात सापडला. त्यांना शासनाने मदत करावी, तसेच सोशल डिस्टिन्सचे पालन करून कार्यक्रमात वाद्ये वादनास परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार जाधव यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली होती.
त्यानुसार जिल्हा प्रशासनाने विवाह समारंभास उपस्थित राहणाऱ्या ५० लोकांच्यामध्ये आयोजकांनी वाजंत्र्याचा समावेश केल्यास, विवाहात वाद्ये वाजवता येणार आहेत. कोरोनाचा संसर्ग होणार नाही, तसेच सोशल डिस्टिन्सचे पालन वादकांना करावे लागणार आहे. त्यामुळे बँड, बाजा, सनई, हलगी आदी वाद्ये विवाह समारंभात आता वाजणार आहेत.
आमदार जाधव यांच्या मागणीमुळे वाद्य वादनास परवानगी मिळाल्याने वाजंत्री व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे. विवाह समारंभातील वातावरण उत्साही होणार आहे.
दरम्यान, आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पाठपुराव्यामुळेच अडचणीत सापडलेल्या वाजंत्री व्यवसायाला नवसंजीवनी मिळाल्याची प्रतिक्रिया कोल्हापूर जिल्हा घडशी समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.