विविधा : श्रीनिवास खळे

-माधव विद्वांस

आपल्या संगीताने मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीतकार कै. श्रीनिवास खळे यांची आज जयंती. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1926 रोजी बडोदा येथे झाला. बडोद्यातल्या सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयात मधुसूदन जोशी यांच्याकडून त्यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले.

सुरुवातीस बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून काही वर्षे नोकरी केल्यानंतर खळे नशीब अजमावण्यासाठी मुंबईत आले. परंतु येथे त्यांचा कोठे शिरकाव होईना. त्यांच्या मित्राने त्यांची राहायची व जेवायची सोय केली म्हणून मुंबईसारख्या ठिकाणी त्यांचा निभाव लागला. यावेळी के. दत्ता (दत्ता कोरगावकर) ह्या संगीतकाराशी त्यांची ओळख झाली व त्यांचे सहाय्यक म्हणून काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांना थोडीफार स्वतंत्रपणे चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनाची संधी मिळू लागली. पण चित्रपट पूर्णत्वाला जाईनात. त्यामुळे त्यांना नैराश्‍य आले. बाजापेटी विकून दुसरे काहीतरी करावे असे त्यांना वाटू लागले. यावेळी मात्र त्यांच्या पत्नीने त्यांना धीर दिला व नैराश्‍यातून बाहेर आणले.

वर्ष 1952 मध्ये त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी दोन गाणी संगीतबद्ध करण्याची संधी अली. गदिमांनी रचलेले “गोरी गोरी पान’ हे बालगीत संगीतबद्ध करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यावेळी आवाज अशा भोसले यांचा होता तसेच गदिमांचे “एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ हे गीतही त्यांच्याकडे संगीतबद्ध करण्यासाठी आले. आवाजही आशाताईंचाच होता. अर्थात ज्या चित्रपटासाठी (चित्रपट लक्ष्मीपूजन) हे गाणे केले होते, त्याचा निर्माता बदलल्यामुळे हे गाणे प्रदर्शित झाले नाही. मात्र गदिमांना या गाण्याच्या चाली इतक्‍या आवडल्या होत्या की त्यांनी त्याची ध्वनिमुद्रिका (त्यावेळच्या शब्दामध्ये तबकडी) एचएमव्हीकडून बनवून घेतली व संगीतकार म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली, त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

पुढे 1960 मध्ये राजा बढेंनी दोन महाराष्ट्रगीते लिहिली, औचित्य होते 1 मे 1960 या महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिवसाचे. त्यांपैकी एक म्हणजे “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत खळे साहेबांनी संगीतबद्ध केले व शाहीर साबळे ह्यांनी पहाडी आवाजात गायले. दुसरे महाराष्ट्र गीत म्हणजे “महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान’ हे गीतसुद्धा खूपच गाजले. प्रल्हाद केशव अत्रे लिखित संगीत पाणिग्रहण ह्या संगीत नाटकाला त्यांनी संगीत दिले होते. श्रीनिवास खळे यांनी प्रामुख्याने भावगीत-भक्‍तिगीत हे प्रकार भरपूर हाताळले. एचएमव्हीमध्ये संगीतकार म्हणून वर्ष 1968 सालापासून खळे साहेब रुजू झाले.

वर्ष 1973 मधे त्यांनी “अभंग तुकयाचे’ हा संत तुकारामांच्या अभंगांचा संग्रह लता मंगेशकरांकडून, तर “अभंगवाणी’ हा संग्रह पंडित भीमसेन जोशी यांच्याकडून गाऊन घेतला. त्यानंतर लताबाई आणि भीमसेन जोशी यांच्या आवाजात “राम-श्‍याम’ गुणगान या नावाने एक भक्‍तिगीतांची ध्वनिमुद्रिकाही त्यांनी काढली.

सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, वीणा सहस्रबुद्धे, उल्हास कशाळकर, पंडित भीमसेन जोशी, सुधीर फडके, वसंतराव देशपांडे, लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माणिक वर्मा, सुलोचना चव्हाण, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अरुण दाते, सुधा मल्होत्रा, सुरेश वाडकर, देवकी पंडित, कविता कृष्णमूर्ती, शंकर महादेवन ते लिटिल चॅम्प आर्या आंबेकर अशा कितीतरी दिग्गज कलाकारांनी त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गायली.

चित्रपटासाठी त्यांच्या गीतांची संख्या फारच कमी होती. त्यांनी संगीतबद्ध केलेली ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ भीमसेन जोशींनी गायलेले सावळे सुंदर रूप मनोहर, वसंतराव देशपांड्यांनी गायलेले बगळ्यांची माळ फुले, आशा भोसले यांचे कंठातच रुतल्या ताना अशी अनेक गाणी रसिकांच्या ओठावर आजही आहेत. प्रतिभावान संगीतकारास अभिवादन.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.