मुशर्रफ यांच्या देशद्रोहाचा खटलाच घटनाबाह्य – लाहोर उच्च न्यायालयाचा निकाल

लाहोर – पाकिस्तानचे माजी लष्करी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या विरोधातील विशेष न्यायालयातील देशद्रोहाच्या खटल्याला लाहोर उच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवले आहे. मुशर्रफ यांना गेल्या वर्षी या खटल्यामध्ये दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लाहोर उच्च न्यायालयाचे न्या. सईद मुझहर अली अकबर नक्‍वी, न्या. मोहंम्मद आमिर भाटी आणि न्या. चौधरी मसूद जहांगिर यांच्या पूर्णपिठाने याबाबतचा निकाल दिला आहे. हा खटला कायद्यानुसार चालवला गेला नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

विशेष न्यायालयाने मुशर्रफ यांच्या अनुपस्थितीत देशद्रोहाचा खटला चालवून त्यात मुशर्रफ यांना दोषी ठरवले होते. या प्रकरणी मुशर्रफ यांना फाशीची शिक्षाही ठोठावली होती. या संदर्भात मुशर्रफ यांनी लाहोर उच्च न्यायालयात काही याचिका दाखल करून निकालाला आव्हान दिले होते. विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालामध्ये राज्यघटनेतील काही तरतूदींचा भंग झाला आहे. कार्यकक्षेमध्ये नसताना घटनाबाह्यरितीने या खटल्याचे कामकाज केले गेले आहे, असा दावा करून या न्यायालयाने दिलेला निकाल बेकायदेशीर ठरवावा, अशी मागणी मुशर्रफ यांनी केली होती.

मात्र हिवाळ्याच्या सुटीमुळे न्यायालयाचे पूर्ण पिठ उपलब्ध नसल्याने मुशर्रफ यांच्या याचिका लाहोर उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 27 डिसेंबरला परत पाठवल्या होत्या. यावर्षी 8 जानेवारीला मुशर्रफ यांच्यावतीने पुन्हा याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.