महापौरांचे पुनश्‍च: हरीओम, पुण्यातील उपलब्ध बेडचा घेतला आढावा

पुणे : महापौर मुरलीधर मोहोळ यांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यानंतर उद्या ( शुक्रवारी) महापौरांचा विलगीकरणाचा कालावधी संपत असतानाच; महापौर पुन्हा कार्यरत झाले आहेत. शहरात बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असल्याने महापौरांनी गुरूवारी पालिका आयुक्तांना फोन करून उद्या ( शुक्रवारी) शहरातील बेडचा सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या शिवाय, उद्या होणाऱ्या मुख्यसभेसही महापौर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, महापौरांनी करोनावर मात केली असली तरी त्यांना अद्यापही थकवा आहे. मात्र, त्यानंतरही त्यांनी पुन्हा आपल्या पूर्वीच्याच अंदाजात कामाला सुरूवात केली आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ यांना 3 जुलै रोजी करोना झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांच्या कुटूंबातील इतर आठ जणांनाही करोनाची बाधा झाली होती. या सर्वांवर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, महापौरांची प्रकृती सुधारल्यानंतर पाच दिवसांनी त्यांना घरी सोडत विलगीकरणात ठेवण्यात आले होते. हा विलगीकरणाचा कालावधी 17 जुलै पर्यंत आहे. त्यानंतर महापौर पुन्हा करोना नियंत्रणाच्या कामात सहभागी होणार होते. मात्र, गेल्या काही दिवसात शहरात बेड नसल्याच्या तक्रारी मोठया प्रमाणात येत आहेत. त्यातच, महापौरांना करोनाची बाधा होण्याच्या एक दिवस आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साप्ताहिक आढावा बैठक झाली होती.या बैठकीत विद्यमान आयुक्त विक्रम कुमारही उपस्थित होते. मात्र, या बैठकीस दोन आठवडे होत आले तरी अद्याप खासगी रूग्णालयांचा डॅशबोर्ड अपडेट होत नाही, नेमक्‍या बेडची माहिती मिळत नाही. खासगी हॉस्पीटल उपचार नाकारत आहेत. ही स्थिती कायम आहे. मग प्रशासनाने मागील दोन आठवडयात याबाबत काय उपाय योजना केल्या याचा अहवाल महापौर मोहोळ यांनी प्रशासनाकडून मागविला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.