मलप्पुरम – आपल्या स्वत:च्याच अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून तिची गर्भधारणा होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी केरळ न्यायालयाने सोमवारी एका व्यक्तीला तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मांजेरी फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्टाचे न्यायाधीश राजेश के यांनी आरोपीला भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉस्को) कायद्यांतर्गत तीव्र लैंगिक अत्याचारासाठी तसेच पीडितेला धमकावल्याबद्दल दोषी ठरवले.
या प्रकरणाची माहिती देताना स्थानिक पोलिस म्हणाले की, बलात्काराची पहिली घटना मार्च 2021 मध्ये घरात कोणीही नसताना घडली होती. या खटल्यातील फिर्यादीने सांगितले की, 15 वर्षीय मुलीने कोविड-19 साथीच्या आजारामुळे ऑनलाइन क्लासेस घेतले होते आणि ती शिकत होती तेव्हा तिच्या वडिलांनी तिला आपल्या बेडरूममध्ये ओढले आणि घरी कोणी नसताना तिच्यावर बलात्कार केला.
जेव्हा पीडितेने विरोध केला तेव्हा वडिलांनी त्या मुलीच्या आईला (म्हणजे स्वत:च्या पत्नीलाच) जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर, घरी कोणी नसताना दोषीने ऑक्टोबर 2021 पर्यंत क्रूरकर्मा बापाने स्वत:च्या मुलीवर अनेक वेळा बलात्कार केला. नोव्हेंबर 2021 मध्ये जेव्हा पुन्हा प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले, तेव्हा पीडितेने शाळेत जायला सुरुवात केली आणि त्यादरम्यान पोटात काही दुखू लागले, ज्यासाठी तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले, परंतु त्यावेळी काहीच कळले नाही.
जानेवारी 2022 मध्ये जेव्हा तिने पुन्हा पोटात वेदना होत असल्याची तक्रार केली तेव्हा तिला सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले, जिथे ती गर्भवती असल्याचे आढळून आले आणि त्या वेळी मुलीला याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले, त्यानंतर गुन्हा दाखल करून वडिलांना अटक करण्यात आली. त्यानंतर गर्भ, मुलगी आणि तिच्या वडिलांचे डीएनए नमुने घेण्यात आले.
डीएनए चाचणीत मुलीचे वडीलच दोषी असल्याचे सिद्ध झाले आहे.
आरोपींना दोषी ठरवण्यासाठी पीडिता आणि तिच्या आईच्या जबाबांसह डीएनए पुरावे महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. गुन्हा दाखल झालेल्या वाझिक्कडवू पोलिस स्टेशनमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सुनावणीच्या दरम्यान आरोपी कारावासाबाहेर येऊ नये आणि पीडितेवर किंवा साक्षीदारांवर प्रभाव टाकू नये यासाठी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात आला होता.