कराड -सतरा वर्षांच्या पोटच्या मुलीचा आई-वडिलांनीच खून केल्याची धक्कादायक घटना काल (दि. 1) उघडकीस आली आहे. संशयितांनी मुलीचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह डोंगरात पुरला होता. पोलिसांनी पंधरा दिवसांनी काल (दि. 1) खड्डा खोदून मृतदेह बाहेर काढला. मुलीच्या प्रेमप्रकरणातून आई-वडिलांनी हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुसूर, ता. कराड परिसरातील एका गावातील 17 वर्षांच्या मुलीचे गावातील युवकाशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांना मुलीच्या आई-वडिलांचा विरोध होता. त्यातच मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर विवाह करण्याचा निर्णय त्या दोघांनी घेतल्याचे आई-वडिलांना समजले होते. त्यामुळे ते मुलीवर चिडून होते. त्यांनी 17 एप्रिल रोजी समजूत घालण्याच्या बहाण्याने मुलीला नजीक असलेल्या मामाच्या गावाकडे नेले. तेथे तिची समजूत घालण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. मुलगी ऐकायला तयार नसल्याने आई-वडिलांनी तिला सायंकाळी 7 च्या सुमारास गावापासून काही अंतरावर असलेल्या डोंगरात नेले. तेथे दोरीने गळा आवळून तिचा खून केला.
त्यानंतर डोंगरामध्ये खड्डा खोदून त्यात मृतदेह पुरला आणि दुसऱ्या दिवशी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दिली. पोलीस गेले पंधरा दिवस मुलीचा शोध घेत होते; परंतु मुलीची कसलीच माहिती मिळत नव्हती. अखेर गावात केलेल्या चौकशीनंतर मुलीचे गावातील युवकाशी प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. अधिक चौकशीत पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी मुलीच्या आई-वडिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून तपास केला असता, त्यांनी खुनाची कबुली देऊन मुलीचा मृतदेह डोंगरात पुरल्याचे सांगीतले. याप्रकरणी पोलिसांनी आई-वडिलांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.