संतप्त जमावाच्या मारहाणीत मृत्यू
पुणे – दुचाकीतून पेट्रोल चोरी करणाऱ्या व्यक्तीचा मारहाणीत जागीच मृत्यू झाला. प्रशांत ढाकणे (वय 40) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा प्रकार वारजे महामार्ग डुक्कर खिंड येथे सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
खून झालेली व्यक्ती ही सुरुवातीला वॉशिंग सेंटरचे काम करत होता. नंतर तो पानटपरीवर काम करत होता. दरम्यान, शेजारी असलेल्या एका वॉशिंग सेंटरवर एका व्यक्तीने त्याची दुचाकी सोडली होती. त्यावेळी मयत ढाकणे हा दुचाकीतून पेट्रोल चोरी करत होता. त्याचवेळी ज्या व्यक्तीची दुचाकी होती तो त्या ठिकाणी चारचाकी गाडीतून त्याच्या इतर साथीदारांसोबत आला. पेट्रोल चोरी करताना ढाकणेला त्यांनी पाहीले असता, बेदम मारहाण केली. त्यामध्ये ढाकणेचा मृत्यू झाला.
त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळाताच वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक कदम, गुन्हे निरीक्षक अमृत मराठे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला.