पतीला अटक : चुलीवरील तवा घातला डोक्यात
पुणे – पत्नीने दारूसाठी पैसे न दिल्याने पतीने चुलीवरील लोखंडी तवा डोक्यात मारून तिचा खून केला. ही घटना गुरुवारी दुपारी केशवनगर, मांजरी रस्ता झेड कॉर्नर येथे घडली. खुनाची माहिती मिळताच हडपसर पोलीस घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. कला आदिनारायण यादव (वय 30) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला.
आदीनारायण यादव (वय 32) असे अटक केलेल्याचे नाव आहे. नातेवाईक रामकृष्ण कानन भोईना (वय 29, रा. मांजरी) यांनी फिर्याद दिली. यादव दाम्पत्य पुण्याच्या केशवनगर मांजरी रस्ता परिसरात भाड्याच्या घरात राहते. दोघेही मजुरीचे काम करतात. त्यांना तीन मुले आहेत.
पतीला दारू पिण्याचे व्यसन असल्याने त्यांच्यात रोज वाद होत होते. गुरुवारी बारा वाजण्याच्या सुमारास आदिनारायण यादव याने पत्नी कला हिला दारुसाठी पैसे मागितले. मात्र, कला हिने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यात नेहमीप्रमाणे भांडणही झाले. त्यातून आरोपीने हे कृत्य केले.
दरम्यान, पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून घाबरलेला आदीनारायण घरातच बसून होता. परंतु शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. हडपसर पोलिसांनी आरोपीला अटक केली.