तळेगाव दाभाडे – मुलगी झाल्याच्या कारणावरून पतीने पत्नीचा हाताने गळा आवळून खून केला. चांदखेड येथील ठाकरवस्तीमधील चंदनवाडी येथे शनिवारी (दि. 28) सकाळी 8 वाजता ही घटना उघडकीस आली. चांगुणा योगेश जाधव (वय 20, रा. चंदनवाडी, ठाकरवस्ती, चांदखेड, ता. मावळ, पुणे) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी योगेश कैलास जाधव (वय 26) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती योगेश व पत्नी चांगुणा यांचा 2018 मध्ये विवाह झाला होता. त्यांना फेब्रुवारी 2021 मध्ये मुलगी झाली. चांगुणा हिला मुलगी झाल्याच्या रागातून पती योगेश वारंवार चांगुणा हिला मारहाण करीत होता. शुक्रवारी (दि. 27) दुपारी सहा महिन्यांच्या मुलीला लस देण्यासाठी पत्नी चांगुणा परंदवडी येथे आली होती. सायंकाळी 7 वाजता घरी गेली. दोघी रात्री 9.30 वाजता झोपी गेले. शनिवारी (दि. 28) सकाळी 8 वाजता लहान मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने परिसरातील नातेवाईकांनी घरात डोकावले असता चांगुणाचा निपचित पडली होती. पती योगेश याने घटनास्थळावरून पळ काढला होता. अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस उपायुक्त संजय नाईक पाटील, पोलीस निरीक्षक शहाजी पवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप गाडीलकर व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला शिरगाव-परंदवडी पोलिसांनी काही तासांत ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप गाडीलकर तपास करीत आहेत.