सातारा तालुक्यातील अंबवडे येथील घटना; संशयित पती पोलिसांच्या ताब्यात
सातारा(प्रतिनिधी) : किरकोळ कारणावरून झालेल्या वादाच्या कारणातून पतीनेच पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना मानेवाडी ता. सातारा येथील उरमोडी नदीपात्रात सोमवारी रात्री घडली. तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, संशयित पती सचिन भगवान गुजर (वय 38, रा.मानेवाडी) याला ताब्यात घेतला आहे. खूनाचे नेमके कारण समोर आले नसून पोलिस तपास करत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सचिन व त्याची पत्नी राधिका गुजर (वय 35) हे सोमवारी उरमोडी नदीपात्रालगत असलेल्या रानात गेले होते. त्यावेळी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास त्या दोघा पती-पत्नीमध्ये वादावादी झाली. काही क्षणातच त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. याच रागातून सचिन याने राधिकाला बेदम मारहाण केली व शेजारी पडलेला दगड पत्नीच्या डोक्यात घातला.
या घटनेत राधिका गुजर गंभीर जखमी झाल्या होत्या. दरम्यान हा प्रकार काही लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सातारा तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सचिन याला ताब्यात घेतला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.