एकरुखे येथील घटना ः आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर
राहाता : तालुक्यातील एकरुखे येथील एकाने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करून मृतदेह पेटवून दिला. छाया सुनील लेंडे (वय 32) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि.22) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. आरोपी सुनील जनार्दन लेंडे हा स्वतः राहाता पोलीस ठाण्यात हजर झाला. याबाबत सतीश तरस याने राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती अशी की, सुनील लेंडे व छाया यांचा 2008 मध्ये विवाह झाला होता. त्यांना तीन मुले आहेत. सुनील हा छायाच्या चारित्र्यावर कायमच संशय घेत मारहाण करत होता. छायाच्या घरच्यांनी व नातेवाईकांनी सुनील यास वारंवार समजावले होते. मात्र शनिवारी दुपारी चारच्या सुमारास आरोपी सुनील याने आपल्या पत्नीस त्यांच्याच शेतात डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून ठार मारले. तसेच रात्री साडेआठ वाजता एकरुखे-नपावाडी रस्त्यावर आग्रे यांच्या शेतीजवळ रस्त्याच्या कडेला मृतदेह पोत्यात घालून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अर्धवट जळाला.
हा अर्धवट जळालेला मृतदेह राहाता पोलिसांनी ताब्यात घेतला. तसेच उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात एकरुखे स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यविधी करण्यात आले. आरोपी सुनील याने पत्नीचा खून केल्यानंतर तो स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. राहाता पोलिसांनी सुनील लेंडे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भोये हे करत आहेत.