राजगुरूनगर : शिरोली (ता. खेड) येथे खापरदरा मधील हरणटेकडीवर दोन अज्ञात तरुणांचा धारधार हत्याराने खून केल्याची घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उघड झाली.
आज शनिवारी (दि.८) रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गुरे चारणाऱ्या गुरख्याच्या ही घटना लक्षात आली. दोन्ही युवकांचा खून झाला त्या ठिकाणी दारूची ग्लास आणि गांजा पिण्याची चिलीम सापडली आहे. अगोदर या ठिकाणी त्यांची पार्टी झाली त्यानंतर या तरुणांचा खून करण्यात आला असावा आणि हे खून जवळच्या व्यक्तींनी केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक सतीश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बडाख, मनसेचे तालुका प्रमुख मंगेश सावंत, यांच्यासह पोलीस पथके घटनास्थळी आले पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.या तरुणांची हत्या का व कोणी केली ते कोणत्या गावचे आहेत याबाबत माहिती उपलब्ध नसून खेड पोलीस पुढील तपास करीत आहेत. पोलीस उपअधीक्षक गजानन टोम्पे यांनी सांगितले की, येथील हत्या जवळच्या व्यक्तींकडून केली असावी. हत्या झालेले तरुण साधारणतः 25 ते 30 वयोगटातील आहेत.