शिक्रापूर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे 28 ऑगस्ट रोजी खून करण्यात आलेल्या रुपेश जगतराव वाल्हे या युवकाच्या खुनाचा छडा अवघ्या 48 तासांत लावण्यात शिक्रापूर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले असून आरोपीला अटक केली आहे.
केशव रामचंद्र दोरगे (रा. जगतापवस्ती, तळेगाव ढमढेरे; मूळ रा. अनुराज कारखान्यासमोर यवत, ता. दौंड) असे आरोपीचे नाव असून त्याने रुपेश जगतराव वाल्हे (रा. किरकटवाडी)या गुन्हेगार युवकाचा डोक्यात दगड घालून खून केला होता. रुपेशचा खून झाला त्यावेळी खुनाबाबत कोणताही पुरावा मागे राहिलेला नव्हता. तपास करत असताना रुपेश याचा खून त्याच्याच मित्राने केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली; परंतु रुपेशचा खून करणारा केशव दोरगे हा फरार झाला होता.
दरम्यान केशव दोरगे हा आज पहाटेच्या सुमारास शिक्रापूर येथील चौकातून बसमधून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, शिक्रापूरचे पोलीस नाईक अनंता बाठे, तेजस रासकर, अंबादास थोरे, किशोर शिवणकर यांनी शिक्रापूर चाकण चौकात येत सापळा लावला व केशव दोरगेला जेरबंद केले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने रुपेश वाल्हेचा खून केल्याची कबुली दिली. आरोपी दोरगेला शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर हे करीत आहेत.
- म्हणून केला खून
रुपेश हा दोरगे याच्या घरी कधीकधी येत होता तसेच रुपेश याने आरोपी दोरगे याचे पैसे चोरले असल्याचा संशय दोरगे याला होता त्यामुळे केशव दोरगे याने रुपेश वाल्हे याला तळेगाव ढमढेरे येथील बाजार मैदानाच्या परिसरात आणले. त्याला दारू पाजली आणि डोक्यात दगड घालून त्याचा खून केला असल्याचे सांगितले.