राहुरी विद्यापीठ (प्रतिनिधी) – राहुरी खुर्द येथील 19 वर्षीय तरुणाचा लोणी परिसरात दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. अर्जुन अनिल पवार असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत दोन आरोपींना अटक केली आहे.
या प्रकरणी मृत तरुणाचा नातेवाइक गोरख अशोक बर्डे यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी दीपक विजय डोळस, विठ्ठल उर्फ भिवा कैलास कावळे (दोघे रा. राहुरी खुर्द, ता. राहुरी) असे पकडलेल्या आरोपींचे नावे आहे. कुठल्यातरी कारणातून वाद होऊन हा खून झाला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.
आरोपींनी कट कारस्थान रचून पवार याला मद्यप्राशन करून लोणी भागात घेऊन गेले. त्या ठिकाणी त्याचा डोक्यात दगड घालून खून केला. पवार याचे ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रुप करण्यात आला होता. ही घटना मंगळवारी रात्री घडली. ही माहिती कळताच मृताच्या नातेवाईकांनी आरोपींच्या घरासमोर जावून तोडफोड केल्याने राहुरी खुर्द परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मृतदेह नातेवाईक ताब्यात घेत नव्हते. या वेळी पोलिसांसह जिल्हा परिषेदेचे सदस्य धनराज गाडे, पंंचायत समितीचे उपसभापती प्रदीप पवार, सरपंच निर्मला मालपाणी, अनिल जाधव, ग्रामपंचायत सदस्य दादा शेटे, राम तोडमल, नामदेव पवार,अंकुश बर्डे यांनी नातेवाइकांच्या समजू काढली. या भागात पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वीच राहुरी कारखान्याजवळ एका तरुणीचा दगडाने ठेचून खून झाला होता. या तरुणीची अद्याप ओळख पटलेली नाही.